मुंबई :राज्यात ठाकरे सरकार असताना सामान्य शिवसैनिकांची कामे झाली नाहीत. अडीच वर्षाच्या सरकारमध्ये सामान्य शिवसैनिकांना याला काय मिळाले? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काल झालेल्या एका कार्यक्रमात उपस्थित केला. राज्यामध्ये सत्तापालट झाल्यानंतर नवीन सरकारने जे निर्णय घेतले ते अडीच वर्षा आधी घ्यायला हवे होते, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. मुंबईतील प्रभादेवी परीसरातील रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात आयोजित मेळाव्या दरम्यान ते बोलत होते.
मुख्यमंत्री जेव्हा आपला असतो त्यावेळेस सामान्य कार्यकर्त्यांना आपली चार काम झाले पाहिजेत अशी अपेक्षा असते. मात्र ठाकरे सरकारमध्ये तसं झालं नाही. उलट इतर पक्षाचीच काम झाली. इतर पक्ष वाढायला सुरुवात झाली. शिवसेना चार नंबरचा पक्ष झाला. असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी मुंबईत काल शक्तिप्रदर्शन केले. प्रभादेवी येथे असलेल्या रवींद्र नाट्य मंदिर सभागृहात त्यांनी मेळावा घेतला. हा कार्यक्रम काल सायंकाळी निश्चित झाला असला तरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या व्यस्त कामामुळे याठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळे रात्री एक वाजता मुख्यमंत्री या मेळाव्यात पोचले. मात्र येथे पोहोचल्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर देखील मुख्यमंत्र्यांनी टीका केली. सत्तेत सोबत असूनही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना संपवण्याचा विडा उचलला होता. सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार आमदार बनविण्यासाठी तयार केले. तसेच, शिवसेनेच्या आमदारांना निधी देखील दिला जात नव्हता. असा आरोप मेळाव्यातून मुख्यमंत्र्यांनी केला आहे.