मुंबई -केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला निशाणी 'ढाल तलवार' दिली आहे. तर काल एकनाथ शिंदे गटाला "बाळासाहेबांची शिवसेना" हे नाव देण्यात आलं होतं. यासोबतच उद्धव ठाकरे गटाला "शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे" हे नाव देण्यात आले आहे. मात्र शिवसेनेचे पारंपारिक निशाणी असलेले धनुष्यबाण गोठल्याने शिवसैनिकांमध्ये हळहळ व्यक्त होत होती. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देत असताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विरोधकांमुळेच शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणी गोठली, असा आरोप नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.
एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया -केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आमच्याकडून सर्व कागदपत्रे वेळेवर देण्यात आली. मात्र उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने प्रतिज्ञापत्र देण्यास विलंब करण्यात आला. प्रतिज्ञापत्र देण्यासाठी चार वेळा केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वेळ मागितल्यानंतर ही प्रतिज्ञापत्र देण्यात आली नव्हती. त्यातच अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात निवडणूक लागल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवण्याचा तात्पुरता निर्णय घ्यावा लागला. पोट निवडणूक पार पडल्यानंतर पुन्हा एकदा सुनावणीनंतर धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव आपल्याच गटाला मिळेल असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.