मुंबई -मुंबईमध्ये पाऊस पडला की पाणी साचते. पाणी साचले की नालेसफाई ( work of BMC for Nalesafai ) योग्य प्रकारे झाली नसल्याचे आरोप भाजपकडून करण्यात आले आहेत. मात्र, महापालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे यंदा पाऊस पडला तरी पाणी साचून राहिलेले नाही, असे सांगत पालिकेच्या कामांची स्तुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) केली आहे. तसेच भाजपचे ( BJP ) जे काही आरोप आहेत त्यावर नंतर बघू, निगेटिव्ह बोलण्यापेक्षा चांगलं करुया, असे म्हणत शिवसेनेच्या कारभाराला क्लीनचिट दिली. यामुळे भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदे यांनी भाजपाला दणका दिल्याची चर्चा आहे.
पालिकेचे काम चांगले -मुंबईमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे मुंबईचे जनजीवन अस्त्यव्यस्थ झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासह आमदार मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पालिकेच्या वॉर रुममध्ये आढावा घेतला. मुंबईत लावलेल्या ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे मुंबईची पाहणी केली. २०० पेक्षा जास्त पाणी साचण्याची ठिकाणे आहेत. ती आता कमी झाली आहेत. हिंदमाता येथे पाणी साचून राहायचे, पण आता ते कमी झाले आहे. पालिकेने पम्पिंग स्टेशन उभारली, पंप लावले, इतरही उपाययोजना केल्या. यामुळे पाणी जास्त वेळ साचून राहिले नाही. हे पालिकेने केलेल्या कामामुळे झाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांवर उपाय म्हणून पालिकेने काँक्रिटीकरणाचे काम लॅबकर पूर्ण करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
रेल्वे बंद पडल्यास बेस्ट, एसटी बसेस -रेल्वेच्या हद्दीत २५ ठिकाणे अशी आहेत ज्या ठिकाणी पाणी साचले की लोकल ट्रेन बंद होऊन प्रवाशांना होतो. प्रवाशांना घरी परतण्यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. हा त्रास कमी करण्यासाठी अशा ठिकाणी बस आणि एसटीची व्यवस्था केली जाईल. पालिकेने बेस्टच्या बसेस उपलब्ध कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. धोकादायक इमारतींना पालिका नोटीस बजावते. त्यामधील नागरिकांना पालिका तात्पुरता निवारा उभारते. जीव महत्वाचा असल्याने या निवाऱ्यांमध्ये नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसात राहावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. खासदार, आमदार नव्हे एखाद्या सामान्य नागरिकांनी तक्रार केली तरी ती त्वरित सोडवली गेली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.