अमरावती -अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात असलेल्या पाचडोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी पिल्यामुळे 50 जणांना अतिसाराची लागण ( Amravati Contaminated Water Case ) झाली. या घटनेत तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या परिवाराला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तीन नागरिकांच्या परिवाराला प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार ( CM Eknath Shinde announced To Provide Rs 5 lakh ) आहे.
मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन - मेळघाट परिसरातील पाच डोंगरी आणि कोयलारी गावात खुल्या विहिरीतील दूषित पाणी पिल्याने 50 जणांची प्रकृती खराब झाली होती. या सर्वांना अतिसाराची लागण झालेली. यामधील 3 जणांचा मृत्यूही झालेला. त्याची माहिती मिळताच दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क साधला होता. रुग्णांवर तातडीने उपचार करावेत, तसेच गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असली तरी उर्वरित नागरिकांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. सर्व रुग्णांना योग्य उपचार मिळतील तसेच मृतांचा आकडा वाढू नये यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.