मुंबई -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी बंडखोरी करत राजकीय भूकंप केला होता. शिंदे यांनी शिवसेनेसह अपक्ष ५० हुन अधिक आमदारांना सुरत, गुवाहाटीमार्गे गोव्याला नेले होते. आज ( 2 जुलै ) तब्बल ११ दिवसांनंतर हे बंडखोर आमदार विमानाद्वारे मुंबईत परतले ( Rebel Shivsena Mla Arrived At Mumbai ) आहेत. हे सर्व आमदार ताज प्रेसिडंट हॉटेलमध्ये राहणार आहेत. याठिकाणी रात्री त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत.
बंडखोर आमदार येत असल्याने तगडा बंदोबस्त -शिवसेनेतून बंडखोरी केलेले एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आणि अपक्ष असे एकूण ५० हुन अधिक आमदार सुरत मार्गे गुवाहाटी आणि त्यानंतर गोव्याला गेले होते. त्यानंतर, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार गोव्याहून मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्व आमदार ताज प्रेसिडंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार आहेत. बंडखोर आमदार मुंबईत येत असल्याने मुंबई विमानतळापासून ताज प्रेसिडंट हॉटेलपर्यंत पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान, उद्या ( 3 जुलै ) सकाळी १० वाजता हे सर्व आमदार विधानभवनात अध्यक्ष निवड व सोमवारी बहुमत चाचणीसाठी मतदानात सहभागी होणार आहेत.
भाजपकडून राहुल नार्वेकर - भाजपच्या वतीने राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या ( Assembly Speaker Election 2022 ) निवडणुकीसाठी अर्ज भरला आहे. राहुल नार्वेकर यांना उभे करून भाजपने शिवसेनेला कात्रीत पकडले आहे. कारण राहुल नार्वेकर हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी आणि त्यानंतर भाजप असा नार्वेकरांचा प्रवास राहिला आहे. त्यामुळे ही निवडणूक तशी एक शिवसैनिक विरुद्ध दुसरा शिवसैनिक अशीच होत आहे. नार्वेकरांच्या उमेदवारीच्या माध्यमातून शिवसेनेतील ( Shivsena ) आणखी काही मते फोडण्याचा भाजपची रणनीती आहे.