मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोड संदर्भात कामाचा आढावा घेणारी बैठक घेतली. यावेळी काम वेगाने सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होणार नाही याबाबत सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्वकांक्षी असलेला प्रकल्प म्हणजे मुंबईतील कोस्टल रोड. मुंबईत सुरु असलेल्या कोस्टल रोडचे काम वेगाने पुढे सरकत असून पावसाळ्यात देखील आऊटफॉल, पंपिंग, खुले नाले यावाटे साचलेल्या पाण्याचा निचरा कशा पद्धतीने वेगाने केला जातो याविषयी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेकडून आढावा घेऊन व सूचना दिल्या. मुंबई पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा निचरा होऊन कोस्टल रोड कामातही बाधा येणार नाही, तसेच नागरिकांनाही त्रास होणार नाही यासाठी यंत्रणा उभारली असल्याची माहिती यावेळी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड यावेळी उपस्थित होते. प्रारंभी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि पी.वेलारासू यांनी सादरीकरण केले.
पाण्याच्या निचऱ्यासाठी ७७ आउटफॉल साफसफाई, पंप्स कार्यान्वित
प्रियदर्शिनी पार्क, चौपाटी, वरळी सी फेस अशा ठिकाणी एकंदर ७७ आऊटफॉल असून त्यातील ४३ हे समुद्रकिनाऱ्याला समांतर असे आहेत. सर्व आऊटफॉलची व्यवस्थित साफसफाई करण्यात आली आहे. अमरसन्स इंटरचेंज, हाजी अली इंटरचेंज, चौपाटी याठिकाणी पुरेशा क्षमतेचे पंप्स बसविण्यात आले आहेत. कोस्टल रोडला लागून १५ ठिकाणी असे ६३ पंप्स आहेत. पावसाळा सुरु झाला असून पाण्याचा निचरा वेळोवेळी होऊन पाणी साचणार नाही तसेच कामातही बाधा येणार नाही अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
कोस्टल रोडचे ३६ टक्के काम पूर्ण
१०.५८ किमीच्या या सागरी मार्गाचे काम ३६ टक्के पूर्ण झाले असून या प्रकल्पावर एकूण १२ हजार ७२१ कोटी खर्च येणार आहे. प्रत्येकी तिहेरी मार्गाचे दोन मोठे बोगदे यात बांधण्यात येत आहेत. १५. ६६ किमीचे इंटरचेंजेस मार्ग देखील असणार आहेत. आत्तापर्यंत बोगदा खणण्याचे काम ९ टक्के, रिक्लेमेशन ९० टक्के, सागरी भिंत ६८ टक्के अशी कामाची प्रगती आहे.
पाणी साचू नये म्हणून मोठ्या भूमिगत टाक्या
हिंदमाता, गांधी मार्केट, चुनाभट्टी- कुर्ला सायन रेल्वे स्थानक परिसर येथे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी करीत असलेल्या उपाययोजनांची माहितीही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली. दरवर्षी हिंदमाता आणि गांधी मार्केट या सखल भागांमध्ये पाणी साचून होणाऱ्या त्रासावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येत असून या दोन्ही ठिकाणी पाणी साठवणाऱ्या भूमिगत स्वरूपाच्या मोठ्या टाक्या बांधण्यात येत आहेत. सखल भागात पावसाचे पाणी भरू लागले तर, ते या टाक्यांमध्ये सोडण्यात येईल. भरती ओसरल्यानंतर हे पाणी समुद्रात सोडण्यात येईल. यामुळे पाणी साचणार नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली. हिंदमाता परिसरातील साचणारे पाणी हे प्रमोद महाजन उद्यानातील भूमिगत टाक्यांमध्ये कसे साठविण्यात येईल याविषयीची चित्रफितही दाखविण्यात आली. पुढच्या वर्षीपासून या कामामुळे हिंदमाता परिसराला मोठा दिलासा मिळेल असेही सांगण्यात आले. यंदा परळ उड्डाणपूल आणि हिंदमाता उड्डाण पुलादरम्यान जोडरस्ता असून दोन्ही पुलांच्या मधील रस्त्याची उंची वाढविण्यात आली आहे त्यामुळे गेल्या आठवड्यात पाणी तुंबले तरी वाहतूक सुरळीत सुरू राहिली असेही पालिका आयुक्तांनी सांगितले.
गाळ काढण्याच्या कामाचे संगणकीयकरण