मुंबई- अलिकडे समाज माध्यमांवर ट्रोलिंग वाढले आहे. त्यामुळे ट्रोल नियंत्रणासाठी कठोर कायदे केले जातील. मुंबई आयटी सेलला सूचना देऊन ट्रोलिंगमधील दोषींवर करवाई करु. भाजपचा ट्रोलर असेल, तरी कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.
समाज माध्यमांवर ट्रोलिंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना समाज माध्यमांवर ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा विषय आज विधानसभेत मांडला. यावर ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सत्ताधारी भाजपचे समर्थक सरकारवर टीका करणाऱ्यांना समाज माध्यमांवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमक्या देत आहेत. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्या विरोधात सोशल मीडियावरुन ट्रोल करण्यात येत आहे. या विकृतांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती.
सावंत यांना सरकारवर केलेल्या टीकेवरील ट्वीट संदर्भात ७ मे २०१९ पासून समाज माध्यमांवर अत्यंत हीन पातळीवर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जात आहे. फोनवरून व समाज माध्यमांवरून जाहीर धमक्या दिल्या जात आहेत. यामध्ये मंत्रीमंडळातील मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक असल्याचेही दम या धमक्या देणाऱ्यांकडून दाखवला जात असल्याचा आरोप करण्यात आला .