महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

किरीट सोमय्यांना पर्याय नाही, शिवसैनिकांची समजूत काढणार - मुख्यमंत्री - Devendra Fadnvis

सोमय्या यांना पर्याय नसल्याने त्यांच्या उमेदवारीसाठी थेट मुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईशान्य मुंबईतील ज्येष्ठ शिवसैनिकांना वर्षा निवासस्थानी बोलावले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Mar 27, 2019, 2:55 PM IST

मुंबई - ईशान्य मुंबईचे भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध आहे. मात्र सोमय्या यांना पर्याय नसल्याने त्यांच्या उमेदवारीसाठी थेट मुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईशान्य मुंबईतील ज्येष्ठ शिवसैनिकांना वर्षा निवासस्थानी बोलावले आहे. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करणार आहेत.


ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांनी सोमय्या यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी केली आहे. तसेच सोमय्या यांनी शिवसेनेची लिखित माफी मागावी, अशी मागणीही शिवसैनिकांनी केली आहे. यावर सोमय्या काहीही बोलण्यास तयार नाहीत. मात्र सोमय्या यांनी माफी का मागावी, असा सूर काही भाजपच्या नेत्यांनी लावला आहे. गेली पाच वर्षे शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांनी सतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कधी जाहीर टीका तर मुखपत्रातून जिव्हारी लागणारी भाषा वापरली आहे, त्याचे मोजमाप काय ? असा सवालही भाजपच्या गोटातून विचारला जात आहे.


निवडणुकीच्या काळात युती हा नाजूक विषय असल्याने याबाबत जाहीर बोलता येणार नाही. पण मुख्यमंत्री यातून मार्ग काढतील असा विश्वास भाजपच्या नेत्याने व्यक्त केला आहे.
किरीट सोमय्या यांनी आघाडी सरकारच्या काळात कोळसा घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा बाहेर काढून आघाडीला कोंडीत पकडले होते. तसेच अनेकदा पक्षाची बाजू त्यांनी समर्थपणे लावून धरली आहे. ईशान्य मुंबई मतदार संघात त्यांचे कामही चांगले असून त्यांना बदलण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही भाजपचे म्हणणे आहे.


त्याचबरोबर संसदीय मंडळाने ईशान्य मुंबईमधून केवळ सोमय्या यांचेच नाव केंद्रीय निवड समितीला कळवले आहे. त्यामुळे सोमय्या यांनाच उमेदवारी मिळेल यात शंका नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
मंगळवारी भांडूप येथे झालेल्या सभेतही मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि ज्येष्ठ नेते मंत्री प्रकाश मेहता यांनी सोमय्या यांना निर्धास्तपणे राहून ईशान्य मुंबईत काम करण्याचा सल्ला दिला आहे.


मुंबई पालिका निवडणुकीत किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बेछूट भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. यामुळे शिवसैनिक दुखावले आहेत. भाजप शिवसेना युती झाली तरी सोमय्या यांना मदत करणार नसल्याचे ईशान्य मुंबईतील शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. त्यामुळे अद्याप ईशान्य मुंबईतील उमेदवार भाजपने घोषित केलेला नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर सोमय्या यांच्याच नावाची घोषणा होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details