महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन - cmo maharashtra

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. त्यांनी कोरोनासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच त्यांनी कांजूरमार्ग प्रकल्पावरून विरोधकांवर हल्लाबोल केला.

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Nov 8, 2020, 3:51 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रार्दुभाव आता जवळपास आटोक्यात आला असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. अनेकांनी टीका केल्या, पण आपण सर्वांनी जिद्दीने हा कोरोनाचा स्तर कमी केला आहे. राज्यात, मुंबईत रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. दिल्लीत कोरोना वाढत आहे, कारण त्याठिकाणी प्रदूषण आहे. तसेच कोरोनाच्या दृष्टीने दिवाळीनंतरचे 15 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे दिवाळीत प्रदूषण करणारे फटाके टाळावेत, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे.

मुंबईच्या प्रकल्पात मिठाचा खडा का टाकता?

मुंबईच्या प्रकल्पात मिठाचा खडा का टाकता? असा प्रश्न विचारत मुख्यमंत्र्यानी भाजपाला सुनावले. मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई मेट्रोची आरे कारशेडची जागा कांजुरमार्गला हलवण्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहेत. सर्वांची उत्तरे आमच्याकडे आहेत. त्यांना योग्य वेळी समर्पक उत्तर देऊ. विरोधकांकडून मिठाघराची जमीन आहे, असं सांगून प्रकल्पात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही टीकेची चिंता न करता यावर आम्ही काम करत राहू. जर्मनीच्या कंपनीकडून ५४५ दशलक्ष युरोंचं कंपनीकडून माफक दरात कर्ज घेतले आहे, असे ते म्हणाले.

पाश्चिमात्य देशात कोरोनाची दुसरी लाट -

मुख्यमंत्री म्हणाले, जे काम केले आहे, ते चार दिवसांच्या फटाक्यांच्या धुरात वाहून जाता कामा नये. दिवाळी रोषणाई करून साजरी करा. पण फटाके मर्यादित वाजवा, इतरांना त्रास होऊ देऊ नका. पाश्चिमात्य देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे घरातही मास्क लावण्याची सक्ती आहे. 100 वर्षांपूर्वी स्पॅनिश फ्लू आला होता. तो दोन ते तीन वर्षांनी गेला. त्यावेळी 1 कोटी लोक बळी पडले होते. याची आठवण आपण ठेवली पाहिजे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करावे लागू नये. कोविड बेड रिक्त आहेत. ते रिक्तच राहावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली.

राज्याच्या हितासाठी मी टीका सहन करायला तयार-

पुढच्या आठवड्यात दिवाळी आहे. त्यामुळे नियमावली करूया आणि गर्दी टाळूया. ज्येष्ठांनी घराबाहेर पडू नये. मंदिरात गर्दी होईल. त्याचा परिणाम नंतर आपल्याला भोगायला लागता कामा नये. तसेच मुंबईत मास्क न घालणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांच्यावर कारवाई करायलाच हवी. एक जण 400 लोकांना कोरोनाची लागण देऊ शकतो. महाराष्ट्रद्वेष्ट्यानी राज्यावर टीका केली. माझ्यावर देखील टीका होत आहे. मात्र, राज्याच्या हितासाठी मी टीका सहन करायला तयार आहे. उद्या हेच लोक 'तुमचं तुम्ही बघा' बोलून बाजूला हटतील, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

हेही वाचा-रामदास आठवलेंची कोरोनावर मात; कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून साजरा केला आनंद

हेही वाचा-'जनतेने संवेदनशीलता दाखवत फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी'

ABOUT THE AUTHOR

...view details