मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राणे यांना पाठिंबा देत, मुख्यमंत्र्यांच्या विधानांचा समाचार घेतला. ही बाब ताजी असतानाच आता मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
बंद दाराआड अर्धा तास चर्चा -
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आज (शुक्रवार) सह्याद्री अतिथीगृहावर सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व पक्षीय बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली. केंद्रीय मंत्री नारायण राणे अटक प्रकरणानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हेही वाचा -OBC आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका - देवेंद्र फडणवीस
हेही वाचा -ओबीसींच्या आरक्षणासाठी राज्य सरकार करणार सूचना, पर्यायांचा अभ्यास; शुक्रवारी पुन्हा बैठक