मुंबई -महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबत आज(5 जुलै) शासन निर्णय जारी केला आहे. कोरोनामुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या ठरावांनी शासन निर्णयात जारी करण्यात आलेल्या निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा -भाजपाचे 12 आमदार एक वर्षासाठी निलंबित; विधानसभा अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरण
पुन्हा होणार शाळा सुरू -
गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहेत. गेल्यावर्षी दिवाळीनंतर शालेय शिक्षण विभागाने शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या होत्या. प्रथमच शालेय शिक्षण विभागाने इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग काही अटीशर्ती निश्चित करुन २३ नोव्हेंबर, २०२० पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर १८ जानेवारी, २०२१ रोजीच्या इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारी, २०२१ पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. मात्र, त्यानंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट टप्प्याटप्प्याने वाढत गेली. त्यामुळे राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या. पण आता कोरोना संसर्गाची परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणी निवळत असल्याने कोरोनामुक्त गावातल्या शाळा प्रत्यक्ष सुरू करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. तसे शासन आदेशाचे परिपत्रक आज जाहीर केले आहे.
विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन निर्णय -
मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात १५ जून २०२१ आणि विदर्भात २८ जून २०२१ पासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्यात आले. सध्या राज्यभरात ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरू आहेत. सध्या राज्यात कोरोना रुग्ण संख्याची आकडेवारी व तज्ज्ञांचे मत लक्षात घेता असे दिसते की, सध्या १० वर्षापेक्षा कमी वयोगटाच्या मुलांना कोरोना संसर्ग होण्याची सर्वात कमी शक्यता आहे. तसेच १८ वयापर्यंतच्या मुलांना सध्यातरी सदर संसर्ग होण्याची कमी शक्यता आहे. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थी एक वर्षापासून घरी बसले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक, मानसिक दुष्परिणाम होत आहेत, शिवाय त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पुढे जाऊन जसेजसे दिवस जातील, तसेतसे सदर नुकसान भरून काढणे कठीण होणार आहे. त्यामुळे शासनाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कोरोनामुक्त क्षेत्रात शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
हेही वाचा -महाधिवक्ता पदावरून तुषार मेहता यांना काढा; तृणमुलच्या खासदरांची राष्ट्रपतींकडे मागणी
पालकांशी चर्चा करून ठराव करावा-
या शासन परिपत्रकानुसार, राज्यातील कोरोनामुक्त क्षेत्रात ग्रामपंचायती / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठरावांनी खालील निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणारे गावातील. शाळेतील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा. त्यानुसार शाळा सुरू करण्यात याव्यात.
मार्गदर्शक सूचना-
- कोरोनासंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
- शाळा सुरू करताना मुलांना टप्प्याटप्प्यात शाळेत बोलविण्यात यावेत. विविध सत्रात वर्ग भरवावेत.
- एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये ६ फुट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५-२० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, कोणतेही लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठविणे व लगेच कोरोना चाचणी करून घेणे.
- संबंधीत शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी, किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर न करण्याबाबत दक्षता घ्यावी.
- संबंधित शाळेतील शिक्षकाची राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी किंवा त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करू नये.
- शाळा सुरू करण्यापूर्वी किंवा शाळा सुरू झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छताविषयक SOP चे पालन करावे.