महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सिटी सेंटर मॉलला लागलेली आग विझवली; ५६ तासानंतर अग्निशमन दलाला यश - सिटी सेंटर मॉलची आग आटोक्यात

मुंबई सेट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेली आग विझवण्यात अग्निशामक दलास यश आले आहे. तब्बल ५६ तास अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली. या घटनेत अग्निशामक दलाचे ६ जवान जखमी झाले आहेत.

Mumbai Central's City Centre
सिटी सेंटर मॉल

By

Published : Oct 25, 2020, 9:49 AM IST

मुंबई- शहरातील सेंट्रल परिसरातल्या सिटी सेंटर मॉलला गुरुवारी रात्री ८.५३ वाजताच्या सुमारास आग लागली होती. ही आग मॉलमध्ये सर्वत्र पसरल्याने निर्माण झालेल्या धुरामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या. यामुळे ब्रिगेड कॉल घोषित करून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. अखेर आज रविवारी पहाटे ५.०८ वाजता म्हणजेच तब्बल ५६ तासानंतर मॉलला लागलेली आग विझवण्यात मुंबई अग्निशमन दलाला यश आले आहे.

मुंबई सेंट्रल बस स्थानकाच्या जवळ असलेल्या सिटी सेंटर मॉलला आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहने रवाना केली होती. एक दुकानाला लागलेल्या आगीने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळत नसल्याने शुक्रवारी पहाटे २ वाजून ४१ मिनिटांनी 'ब्रिगेड कॉल'ची घोषणा अग्निशमन दलाने केली. त्यानंतर शर्थीचे प्रयत्न करून शुक्रवारी दुपारी ३.३७ वाजता म्हणजेच तब्बल १८.३० तासांनी सर्व बाजूने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाच्या जवांनाना यश आले होते. मात्र,कुलींग काम सुरू असताना पुन्हा एकदा आग लागली.

अग्निशामक दलाच्या जवानांनी शुक्रवारी दुपारनंतरही आपले काम सुरूच ठेवले शनिवारी दिवसभर नियंत्रण मिळवण्याची पराकाष्ठा करणाऱ्या जवानांना आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास या भीषण आगीवर नियंत्रण मिळवून पूर्णपणे शमविण्यास यश मिळाले. म्हणजेच तब्बल ५६ तास ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान झुंजत होते. आता या आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर कुलिंग ऑपरेशन सुरू केले असल्याची माहिती मुंबई अग्निशमन दल आणि पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

आग विझवण्यासाठी २५० अधिकारी, कर्मचारी -
सिटी सेंटर मॉल तळमजला अधिक तीन मजले स्वरूपाची इमारत आहे. या ठिकाणी प्रारंभी दुसऱ्या मजल्यावर आग लागली. या मजल्यावर मोबाईल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचर आणि इतर साहित्यांचे गाळे आहेत. या गाळ्यांना ही आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ही आग तिसऱ्या मजल्यावर देखील पसरली असल्याचे लक्षात आले.आग विझवण्यासाठी २४ फायर इंजिन, १६ जंबो टँक यांच्यासह एकूण ५० अग्नि विमोचक वाहने तैनात करण्यात आली होती. मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी शशिकांत काळे यांच्यासह एकूण सुमारे २५० अधिकारी व कर्मचारी आगीशी झुंज देत होते.

६ जवान जखमी -
आगीमध्ये धुरामुळे श्वसनाचा तसेच इतर मार लागल्याने अग्निशमन दलाचे ५ जवान जखमी झाले. त्यांना जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार करून त्या सर्वांना घरी सोडले आहे. रवींद्र चौगुले (५३ वर्ष), शामराव बंजारा (३३ वर्ष), भाऊसाहेब बदाने (२६ वर्ष), संदीप शिर्के व गिरकर (५० वर्ष) आणि चंद्रशेखर सावंत(५५) अशी या जवान आणि अधिकाऱ्यांची नावे आहेत.

इमारत केली खाली-
मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यामध्ये वाहतूक आणि इतर बाबींमध्ये मदतीसाठी पोलिसांना देखील तैनात करण्यात आले होते. सिटी सेंटर मॉल आगीची तीव्रता लक्षात घेता बेलासिस रोडवरील दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी मार्ग बंद करण्यात आले होते.

यांनी दिली भेट -
घटनास्थळी मुंबईच्या महापौर किशोरी किशोरी पेडणेकर, आमदार अमीन पटेल, महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकानी यांनी रात्री उशिरा भेट देवून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती जाणून घेतली.

ABOUT THE AUTHOR

...view details