मुंबई - मुंबईत पावसाळ्यात घरे, इमारती, दरडी कोसळतात. या दुर्घटना घडल्यावर वेळेवर मदत न मिळाल्याने नागरिकांचे मृत्यू होतात. हे मृत्यू रोखण्यासाठी व दुर्घटनास्थळी त्वरित मदत मिळण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन व्यवस्थापन विभागाकडून दरडी कोसळू शकतात, अशा विभागातील स्थानिक नागरिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. असे प्रशिक्षण दिल्याने दुर्घटनास्थळी बचाव पथक पोहोचण्याआधीच मदत कार्य सुरु करणे शक्य होणार असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली ( Citizens help when houses buildings collapse in mumbai ) आहे.
दरडी कोसळणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना प्रशिक्षण -मुंबईमध्ये मागील वर्षी चेंबूर आणि विक्रोळी येथे दरडी कोसळून ३० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. मुंबईत दरडी कोसळू शकतात अशा ७२ ठिकाणांचा समावेश आहे. याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे. या ठिकाणांना रेड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. या ठिकाणी दुर्घटना घडल्यावर त्याठिकाणी बचाव पथक पोहचण्यास काही कालावधी लागतो. दुर्घटना घडल्यापासून बचाव पथक पोहोचण्याच्या काळात नागरिकांची पळापळ असते. अशा वेळी नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे, त्यांना प्रथोमोपचार देणे असे प्रशिक्षण दिल्यास नागरिकांचे मृत्यू रोखता येऊ शकतात, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी दिली.
१० हजार नागरिकांना प्रशिक्षण -दरड कोसळू शकते अशा ठिकाणी नागरिकांना अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि डॉक्टरांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण दिल्याने दरड कोसळल्यास त्याठिकाणी राहणारे नागरिक, अंथरुणाला खिळून असलेले नागरिक अशा लोकांना त्वरित मदत पोहचवून त्यांचा जीव वाचवणे शक्य होणार आहे. अनिरुद्ध अकॅडमीची यासाठी पालिकेला मदत मिळत आहे. दरडी कोसळू शकतात अशा ठिकाणी १० हजार नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी आतापर्यंत ८ प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले आहे. हे प्रशिक्षण वर्ग कायमस्वरूपी सुरु राहणार असल्याची नार्वेकर यांनी दिली.