मुंबई - मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. विषाणूच्या प्रसारादरम्यान लॉकडाउन आणि कडक निर्बंध आहेत. ज्या नागरिकांनी कोरोना विरोधातील लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा नागरिकांना निर्बंधांमधून सूट देण्याचा निर्णय मुंबई महापालिका घेणार आहे. मात्र, दीड कोटी नागरिकांपैकी केवळ १२ लाख नागरिकांनीच लसीचे दोन डोस घेतले असल्याने, त्यांनाच निर्बंधांमधून सुट मिळू शकते. रेल्वे प्रवास वगळता कार्यालय आणि इतर ठिकाणी ही सवलत दिली जाणार आहे.
'लसीचे दोन डोस घेणाऱ्यांना सवलत'
मुंबईमध्ये गेले दीड वर्ष नागरिक निर्बंधांमध्ये आपले जीवन जगत आहेत. व्यावसायिक वर्ग आपले व्यवसाय बंद असल्याने त्रस्त झाला आहे. शाळा, कॉलेज बंद आहेत. मुंबईकर आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा मुंबईकरांना काही प्रमाणात सवलत देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. ज्या नागरिकांनी कोरोना विरोधातील लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना निर्बंधांमधून सूट दिली जाणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना आस्थापना व इतर ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. मात्र, ज्यांनी दोन डोस घेतले आहेत, अशा नागरिकांना रेल्वे वगळता इतर ठिकाणी सवलत देण्याबाबतचा विचार पालिका प्रशासनाकडून केला जातो आहे.
'मंत्रालयात बैठक होणार'
येत्या १५ जुलैला मंत्रालयात या सुट देण्याच्या विषयावर बैठक घेतली जाणार आहे. त्यामध्ये हा निर्णय घेतला जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला तेव्हापासून लॉकडाउन लावण्यात आला. जून माहिन्यानंतर टप्पाटप्प्याने त्यात शिथिलता देण्यात आली. यावर्षी फेब्रुवारीपासून लोकल ट्रेन सेवा सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. तसेच, निर्बंधांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा रुग्णसंख्या वाढून दुसरी लाट आली. मुंबईमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत एकूण ५९ लाख २९ हजार १९० लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले होते. त्यापैकी, ४६ लाख ८१ हजार ७८० लाभार्थ्यांना लसीचा पहिला, तर १२ लक्ष ४७ हजार ४१० लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
'निर्बंधांमधून सरसकट सूट नाही'
मुंबईकरांना निर्बंधांमधून सूट देण्याचा विचार पालिका करत आहे. मात्र ही सरसकट सर्वच मुंबईकरांना दिली जाणार नाही. १२ लाख ४७ हजार ४१० नागरिकांनाच लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. अशा लोकांनाच निर्बंधांमधून सुट मिळू शकते. लसीचे दोन डोस घेतलेल्यांची संख्या आरोग्य कर्मचारी १ लाख २८ हजार ६४१फ्रंटलाईन वर्कर १ लाख ४२ हजार १२०जेष्ठ नागरिक ५ लाख ८ हजजार ८२४ ४५ ते ५९ वयोगट ४ लाख ९ हजार ८५७१८ ते ४४ वयोगट ५३ हजार २५९ स्तनदा माता ४ मानसिक रुग्ण १० परदेशी शिक्षण घेणारे विद्यार्थी, कामगार, ऑलम्पिक खेळाडू - ४६९५