मुंबई - राज्यातील नाट्यगृहे 50 टक्के क्षमतेने सुरू होणार आहेत. बंदिस्त सभागृहात 50 टक्के क्षमतेने सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. शॉपिंग माल मध्ये कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यानाच तिथल्या सिनेमागृहात जाता येईल. त्यामुळे आता नाट्यगृहे जरी सुरू होत असले तरी ते कोरोना नियमांच्या सावटाखाली सुरू होणार आहेत. त्यामुळे नाट्य व्यावसायिकांवर काही बंधने येणार आहेत. तरीही नाट्यगृहे सुरू होत असल्याने नाट्य कलावंत व नाट्य प्रेमींत आनंदाचे वातावरण आहे. मराठी रंगभूमीला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. गेली दोन वर्षांत नाट्य प्रयोगांना आलेल्या बंधनांमुळे अनेक एकांकिका व नाट्य स्पर्धा बंद होत्या त्या आता होऊ शकणार आहेत. त्यामुळे तरूण नाट्य कलावंतांकडून नाट्य प्रयोगांची तयारी सुरू होणार असल्याचे चित्र आहे.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार 22 ऑक्टो.ला ५० टक्के प्रेक्षक मर्यादेत चित्रपटगृहे सुरू
महाराष्ट्रातील काही अपवादात्मक जिल्हे सोडल्यास कोरोना रुग्ण संख्या अटोक्यात येऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मंदिरे खुली केली. आता चित्रपटगृहे व नाट्यगृहेही खुली केली जाणार आहेत. त्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी नुकतेच दिले होते. त्यानुसार आज राज्य शासनाने नाट्यगृहे सुरू करण्यासंदर्भातील आदेश आज काढले. मात्र नाट्यगृहे सुरू करताना काही अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबर नंतर आरोग्याचे नियम पाळून खुले करण्यास परवानगी देण्यात येईल, अशी घोषणा 25 सप्टेंबरला केली होती. या घोषणेनुसार राज्य सरकारच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांनी आज एक शासन आदेश जाहीर केला. त्यात नाट्यगृहे सुरू करताचे मार्गदर्शक सूचना सांगण्यात आल्या आहेत.