मुंबई - राज्य सरकारने जारी केलेल्या जीआरनुसार २२ ऑक्टोबरपासून राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृहे खुली झाली आहेत. मात्र पहिल्याच दिवशी मुंबईतील सिनेमागृहात थंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. आज मुंबईतील अनेक सिनेमागृहांमध्ये प्रेक्षक दिसले नाही. प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून आले. नवीन मोठे चित्रपटदेखील प्रदर्शित झालेले नाहीत. प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे जावे असे चित्रपट नसल्यामुळेदेखील आज थंड प्रतिसाद पाहायला मिळाला.
हेही वाचा -निळू फुले : सिनेमात इरसाल पुढारी, खऱ्या आयुष्यातला हळवा माणूस
50% प्रेक्षक उपस्थिती
चित्रपट पाहण्यासाठी मोठी नियमावली असल्यामुळे प्रेक्षकांनी सिनेमागृहाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. नियमावलीनुसार आरोग्य सेतू अॅप डाउनलोड केलेल्या किंवा कोरोना प्रतिबंधित लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रेक्षकांनाच सिनेमागृहात प्रवेश दिला जाणार आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेचा वापर करता येणार नाही. आसन व्यवस्थेमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे. चित्रपटगृहांमध्ये वेळोवेळी ऑडिटोरिअम, कॉमन एरिया आणि वेंटिग एरिया यामध्ये एकदम गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमा पाहण्यास येणाऱ्या प्रेक्षकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. अशाप्रकारचे नियम असल्याने चित्रपटगृहांकडे त्यांनी पाठ फिरवल्याचे दिसते.