मुंबई :अंडरवर्ल्ड डॉन 'छोटा राजन'ला दोन वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिक नंदू वाजेकर यांना 26 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी ही शिक्षा देण्यात आली आहे. याप्रकरणी छोटा राजनसोबत आणखी तीन आरोपींना शिक्षा जाहीर करण्यात आली आहे. प्रत्येकी पाच हजारांचा दंड आणि दोन वर्षे तुरुंगवास असे या शिक्षेचे स्वरुप आहे. मुंबईच्या मोक्का न्यायालयाने याबाबत निर्णय दिला.
२०१५चे आहे प्रकरण..
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नंदू वाजेकर या बिल्डरने २०१५मध्ये पुण्यात काही जमीन खरेदी केली होती. यासाठी परमानंद ठक्कर नावाच्या एजंटला दोन कोटी रुपये देण्याची बोली झाली होती. मात्र, ठक्कर याने वाजेकर यांना अधिक पैशांची मागणी केली. वाजेकर यांनी ही मागणी फेटाळताच ठक्करने छोटा राजनशी संपर्क साधला.
त्यानंतर छोटा राजनच्या गुंडांनी वाजेकर यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन धमकी दिली होती, तसेच २६ कोटी रुपयांची मागणीही केली होती. सुरेश शिंदे, लक्ष्मण निकम आणि सुमित विजय मात्रे अशी या तिघांची नावे आहेत. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही वाजेकर यांना देण्यात आली होती.