मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक विषयांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या अनेक मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता संजय राऊतांच्या वक्तव्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत "सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून चोराच्या मनात चांदणं दिसतंय असं म्हणत महाविकास आघाडीला आयकर विभाग आणि ई़डीची एवढी भीती का वाटतेय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा वाद पेटल्याचं दिसून येतंय
चित्रा वाघ यांचे ट्विट
"सर्वज्ञानी संजय राऊत साहेबांनी सर्व मंत्र्यांना विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचा सल्ला दिलाय….पण त्यांना माझा एक फुकटचा सल्ला आहे….‘वॅाण्टेड‘ असलेल्या माजी गृहमंत्र्यांना पण समोर येऊन उत्तर द्यायचं आवाहन करा…. तेवढीच सरकारची उरली सुरली इज्जत वाचेल…."
हे अलीबाबा आणि 40 चोरांचं सरकार, चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल असा घणाघाती हल्ला चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर चढवला आहे. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांच्या महाराष्ट्रात होणाऱ्या कारवाई व धाडसत्रावरून राजकारण चांगलंच पेटलं असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लूटणाऱ्या टोळीविरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केला आहे. असं चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून ट्विट करत होत असलेल्या कारवाई व धाडसत्राचं समर्थन केलं आहे.
संजय राऊतांची भाजपवर टीका
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईडी, सीबीआयला जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. खूप पॉवरफुल्ल लोकं आहेत. पाठवा ना. अतिरेकी पळून जातील. ते आमच्यावर ज्या प्रकारे ईडी, सीबीआयच्यामाध्यामातून हल्ला करता, या तिन्ही चारही संस्था तुम्ही बदनाम केल्या आहेत. या संस्थांचा तुम्ही राजकीय गैरवापर केला आहे. जा ना काश्मीरमध्ये पाठवा ना. किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा. आम्ही अतिरेक्यांची कागदपत्रे देऊ. फिरत बसतील काश्मीर, अनंतनाग, बारामुल्ला. जा म्हणा, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
हेही वाचा -ईडीसह किरीट सोमैयांना काश्मीरला पाठवा, दहशतवादी पळून जातील -संजय राऊत