मुंबई - एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात ( Supreme Court ) आहे. त्यावर 11 जुलैला सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, ही सुनावणी लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशावेळी विधीमंडळ सचिवांकडून सुप्रीम कोर्टाला विनंती करण्यात आली आहे. शिवसेना आमदार ( Shivsena MLA ) अपात्रतेची प्रक्रिया नवीन अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ही याचिका निकाली काढावी, अशी विनंती विधीमंडळ सचिवांनी सुप्रीम कोर्टाकडे केली आहे.
1 जुलैची सुनावणी लांबणीवर पडणार? - राज्यातील सत्तांतरापूर्वी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं होतं. त्यावेळी 16 आमदारांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या शिवसेनेच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने 11 जुलैपर्यंत आमदारांवर कुठलीही कारवाई न करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या होणं अपेक्षित आहे. मात्र, उद्याची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजात सुनावणीबाबत समावेश नाही. उद्या सकाळी सुनावणीबाबतचा समावेश होऊ शकतो. मात्र, समावेशानंतर उद्या सुनावणी होण्याची शक्यता कमीच असल्याचं सांगितलं जातंय.