मुंबई :सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court Of India ) दोन आठवड्याच्या आत जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या ( Local Body Elections ) तारखा जाहीर करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहे. या निर्णयामुळे राज्य सरकार कोंडीत सापडलं आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यास ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण वगळता निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) आणि राज्याचे मुख्य निवडणूक सचिव ( Chief Electoral Secretary ) यांची मुंबई बैठक पार पडली.
या बैठकीत पुढील निवडणुकांबाबत चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून काय हालचाली सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाशी चर्चा केली असल्याची माहिती आहे. मात्र या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्यापही स्पष्टता नाही.