मुंबई- आपल्या देशात अनेक शूरांनी चेतना जागवली आहे. या शुरांपैकी कोणाचे पुतळे उभारायचे कोणाचे आदर्श घ्यायचा आणि कोणाचे आदर्श पुढे न्यायचे हे महत्वाचे आहे. महाराणा प्रताप हे शूर होते. त्यांचा आदर्श घेऊन वारसा पुढे न्यावा. तसेच महाराणा प्रताप यांच्या चेतक घोड्या प्रमाणे नीष्ठावान राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी शिवसैनिकांना केले आहे. मी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा असून तलवार मलाही चालवायला येते, योग्य ठिकाणी ती चालावेल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना इशारा दिला.
चेतक प्रमाणे निष्ठावान राहा -
दक्षिण मुंबईतील माझगाव परिसरात प्रभाग क्रमांक २०९ मध्ये महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारला आहे. या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात ( Unveiling of the statue of Maharana Pratap ) आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पुतळे बसवायला भरपूर जागा आहे. पण, त्यांनी काय केले हे सांगण्याची वेळ येण्यापेक्षा पुतळा न उभारलेला बरा. आपल्या देशात अनेक शूरांनी चेतना जागवली आहे. या शुरांपैकी कोणाचे पुतळे उभारायचे कोणाचे आदर्श घ्यायचा, कोणाचे आदर्श पुढे न्यायचे हे महत्वाचे आहे. माझगावमध्ये शूर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारला आहे. महाराणा प्रताप हे शूर होते. त्याचप्रमाणे त्यांचा लाडका घोडा चेतकही निष्ठावान होता. लढाईमध्ये गंभीर जखमी झाल्यानंतरही महाराणा प्रताप यांचा जीव वाचवून चेतकने प्राण सोडले, असे सांगत चेतक प्रमाणे निष्ठावान राहण्याचा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला. यशवंत जाधव, आमदार यामिनी जाधव व शिवसैनिकांनी महाराणा प्रताप यांचा पुतळा बांधून थांबू नये तर त्यांचा वारसा पुढे न्यावा, असे आदेश दिले.
तलवार गाजवायची मला माहित आहे -
माझ्या हस्ते अनावरण करण्याचा हट्ट यशवंत जाधव यांनी धरला होता. पण, आजारपणामुळे वेळ मिळत नव्हता. आज बाळासाहेबांच्या जयंतीदिनी पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याचे मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेना प्रमुखांनी माझ्या आणि आदित्य सोबत रहा, असे शिवसैनिकांना सांगितले. शिवसैनिक माझ्या आणि आदित्यच्या सोबत हे आमचे भाग्य असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मधल्या काळात शस्त्रक्रिया झाल्याने मला घराबाहेर पडता आले नाही. म्हणून मी गप्प बसलो असे समजू नका. मी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे. माझ्याकडेही तलवार आहे. ती कशी गाजवायची हे मला माहीत आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना इशारा दिला.
उद्देशिकेचे अनावरण -
महाराणा प्रताप यांचा पुतळा ज्या बेटावर उभारण्यात आला आहे. त्या बेटावर महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाचे तैलचित्र उभारण्यात आले आहे. तसेच त्याच्या बाजूलाच भारतीय संविधानाच्या उद्देशिका उभारण्यात आली आहे. या दोन्हीचे अनावरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
‘असा’ आहे अश्वारूढ पुतळा -
प्रत्येक भारतीय योद्ध्यासाठी प्रेरणेचा मानबिंदू असणाऱ्या महाराणा प्रताप यांचा दक्षिण मुंबईत पुतळा उभारला गेला आहे. दक्षिण मुंबईतील माझगाव परिसरात प्रभाग क्रमांक २०९ मध्ये महाराणा प्रताप चौकात महाराणा प्रताप यांचा हा भव्य आणि अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे या विभागाचे नगरसेवक असून त्यांच्या दालनात दिनांक २३ एप्रिल, २०१८ रोजी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार महाराणा प्रताप चौकाचे सुशोभिकरण व महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याचे निश्चित करण्यात आले. हा चौक नेस्बिट मार्ग आणि शिवदास चापसी मार्ग जंक्शनवर स्थित आहे. जे मुळात वाहतूक बेट आहे व इतर पाच वाहतूक बेटाने वेढलेले आहे. चौकाचे सुशोभिकरण आणि महाराणा प्रताप यांचा पुतळा स्थापित करण्याच्या प्रस्तावाला ५ मार्च, २०१९ रोजी मंजुरी मिळाली. धुळे येथील शिल्पकार सरमद शरद पाटील यांनी महाराणा प्रताप यांचा हा पुतळा साकारला आहे. ८ ऑगस्ट, २०१९ रोजी हा पुतळा मुंबईत आणण्यात आला. २० फूट उंचीच्या चौथऱ्यावर, १६ फूट उंचीचा हा भव्य पुतळा स्थापित करण्यात आला आहे. साडेचार टन वजनी आणि कांस्याने बनविलेला हा पुतळा भालाधारी व अश्वारूढ आहे. पुतळा उभारताना संपूर्ण चौकाचे नावीन्यपूर्ण पद्धतीने सुशोभीकरण देखील करण्यात आले आहे.