मुंबई - कोणत्याही परिस्थितीत गरीब, कष्टकरी व हातावर पोट असणाऱ्या व्यक्ती उपाशी राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. केंद्राने नुकतेच जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे तसेच राज्य शासनाच्या यंत्रणेतील रेशनवरील धान्य त्यांना तत्काळ मिळेल. त्यांची अजिबात उपासमार होणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. ते आज 'वर्षा' येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विभागीय आयुक्तांशी संवाद साधत होते. आज पार पडलेल्या या कॉन्फरन्समध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
'हातावर पोट असणारी माणसं उपाशी राहणार नाही' - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानंतर त्यांनी राज्यातील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. लॉकडाऊनमुळे आपल्याला अडकावे लागले आहे. ही परिस्थिती नाईलाजाने उद्भवली आहे. आपण कोरोना निगेटिव्ह असले पाहिजे. मात्र घरातले वातावरण पॉझिटिव्ह ठेवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. 'हातावर पोट असणारी माणसं उपाशी राहणार नाही' - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवभोजन उद्दिष्ट वाढवले या संकटात राज्यभरातील शिवभोजन केंद्रांनी गरजू आणि भुकेल्या लोकांची भूक भागवावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. तसेच हे उद्दिष्ट वाढवून एक लाख केल्याची माहिती त्यांनी दिली. याचा लाभ घेत असतानाच नागरिकांनी धोका वाढेल अशी गर्दी करू नका, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढे बोलताना, रिटेल सप्लाय चेन आणि होम डिलिव्हरी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निर्देश दिल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. पोलीस, महसूल, सहकार, पणन आणि कामगार विभाग यांना सर्व सूचना दिल्या आहेत. त्यामुळे वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित होत राहील याची खात्री बाळगा, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
ऊसतोड कामगार आणि त्यांच्या परिवाराची काळजी घ्या, असे साखर कारखान्यांना सांगितले आहे. हे कामगार आपल्या कुटुंबाचाच एक भाग आहे हे लक्षात ठेवा, असे ठाकरे म्हणाले.
दूध संकलन व्यवस्थित होईल
ग्रामीण भागातून दूध संकलन व्यवस्थित होणार आहे. तसेच शेतकरी आणि ग्राहक या दोघांची कुचंबणा होणार नाही, हे पाहण्याचे निर्देशही दिले आहेत. परराज्यातील नागरिक मोठ्या संख्येने अडकले आहेत. शहरात काम करणारे कामगार आणि श्रमिकांची काळजी प्रशासन घेणार असून यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनी देखील पुढाकार घेतला आहे. मात्र त्यांनी देखील गर्दी न करता व आपल्या मदतीचे योग्य नियोजन करून मदत कार्य करावे.
खासगी डॉकटर्सवर मोठी जबाबदारी
खासगी डॉक्टर्सवरदेखील मोठी जबाबदारी आहे. या लढाईत त्यांची भूमिका मुख्यमंत्र्यांना अधोरेखित केली. आपले दवाखाने सुरू ठेवले पाहिजेत. या डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची व आरोग्याची जबादारी सरकारची असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
रक्तदान शिबिरे घ्यावी
राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवतोय. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी रक्तदान शिबिरे घ्यावी, असे ठाकरे यांनी सांगितले. मात्र, अनावश्यक गर्दी टाळावी.
कुठल्याही परिस्थिती कायदा व सुव्यवस्था यांचे प्रश्न निर्माण होणार नाही, ही जबाबदारी नागरिक म्हणून आपली सर्वांची आहे.
शिर्डी संस्थानाने ५१ कोटी रुपये साहाय्यता निधीसाठी दिले आहेत, सिद्धीविनायकने देखील ५ कोटी देऊ केल्याची माहिती त्यांनी दिली.