महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'मुंबईसह महाराष्ट्राची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प'

लोकसभेत आज मांडलेला अर्थसंकल्प, वास्तावाचे भान हरपलेला आहे. तसेच स्वप्नांच्या दुनियेत जनतेला रमवणारा अर्थसंकल्प आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. या अर्थसंकल्पाने महाराष्ट्राची घोर निराशा केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Chief Minister Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Feb 1, 2020, 7:56 PM IST

Updated : Feb 1, 2020, 11:13 PM IST

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीशी फारकत घेतलेला आहे. तसेच वास्तवाचे भान हरपून देशातील युवा, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांना केवळ स्वप्नांच्या दुनियेत रमवणारा आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा... 'जुन्याच योजना नव्या नावाने पुढे आणणारा फसवा अर्थसंकल्प'

आय.डी.बी.आय आणि एलआयसीमधील आपली भागीदारी विकण्याचा घेतलेला निर्णय, रेल्वेचे खासगीकरण यासारखे निर्णय देशाच्या खिळखिळ्या अर्थव्यवस्थेचे दर्शन घडवतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, काही शासकीय बॉण्ड परदेशी लोकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेतला गेला आहे, तो ही काळजी वाढवणारा असल्याचेही ठाकरे यांनी म्हटले.

केंद्र सरकाने १० टक्के विकास दर गाठण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रत्यक्षात हा विकासदर चालू वर्षी ५ टक्के आणि २०२०-२१ मध्ये ६ ते ६.५ टक्के राहणार असल्याचा अंदाज केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालाने व्यक्त केला आहे. हा गेल्या काही वर्षातील हा सर्वात निचांकी विकास दर आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाच लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाची पुर्तता करण्याची क्षमता या विकासदरात नाही. यासाठी पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षातील तरतूद तोकडी आहे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा... 'भारताच्या अर्थव्यवस्थेतील मरगळ दूर करण्यात अपयशी ठरणारा अर्थसंकल्प'

वस्तू आणि सेवा कराने देशातील लघु-मध्यम आणि सुक्ष्म उद्योगांना दिलासा दिला, घरगुती खर्च ४ टक्क्यांनी कमी झाल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केला असला तरी ही वस्तुस्थिती नाही. वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे लघु-सुक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्र प्रचंड अडचणीत आले. वाढत्या महागाईमुळे लोकांची क्रय शक्ती कमी झाली, वस्तुंना मागणी नसल्याने लघु उद्योग अडचणीत आले, कामगार अडचणीत आला, हे दूर करण्यासाठी रोजगार केंद्रीत उद्योगांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज होती तशी पाऊले या अर्थसंकल्पातून पडलेली दिसत नाहीत, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

रोजगार देण्याचा कोणताही ठोस मार्ग नाही

मागील काही वर्षात केंद्र सरकारने स्टार्टअप, स्टॅण्डअप आणि मेक इन इंडिया सारख्या योजना राबवल्या. उद्योगस्नेही वातावरण निर्माण झाल्याचे, लालफितीचा कारभार बंद झाल्याचे वारंवार सांगितले. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने हाच संकल्प पुन्हा नव्याने केलेला दिसतो. पण त्यासाठी हात राखून निधी दिला आहे. स्कील इंडियासाठी केलेली तरतूद अपूरी आहे. २०३० मध्ये भारत हा सर्वात युवा देश होणार असून या युवा शक्तीच्या हाताला रोजगार देण्याचा कोणताही ठोस मार्ग, या अर्थसंकल्पातून विकसित होतांना दिसत नाही. पर्यटन क्षेत्र ज्यातून मोठ्या रोजगार संधी निर्माण होतात, त्यासाठी अत्यंत कमी तरतूद करण्यात आली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा... शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या बाजूलाच; अर्थसंकल्पावर शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

अन्नदात्याला केवळ स्वप्न...

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा जुना मानस अर्थसंकल्पात नव्याने मांडण्यात आला. अन्नदात्याला उर्जा दाता करण्याचे स्वप्न दाखवले, १५ लाख शेतकऱ्यांचे कृषी पंप सोलर वर आणण्याचा मनोदय व्यक्त केला. तसेच कार्बन उत्सर्जन कमी करणारे थर्मल पॉवर बंद करणार असल्याचे सांगितले. पण नेमक्या या गोष्टी कधी पुर्णत्वाला जाणार, थर्मल पॉवर बंद केल्याने निर्माण होणारी वीजेची तूट कशी भरून काढणार याची स्पष्टता होताना दिसत नाही.

मागील कित्येक वर्षांपासून शेती क्षेत्र अडचणीत आहे. अर्थसंकल्पात शेती क्षेत्रासाठी १६ सुत्री कार्यक्रम जाहीर करून २.८३ लाख कोटी रुपयांची तरतूद या क्षेत्राला उपलब्ध करून दिली. प्रत्यक्षात ही तरतूद मागच्या वर्षीपेक्षा थोडीशीच वाढली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पातून व्यक्त करण्यात आलेले संकल्प आणि त्याच्या सिद्धीसाठी केलेल्या वित्तीय तरतूदी यात विरोधाभास दिसून येतो, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... 'अर्थसंकल्पातून अपेक्षाभंग, शेतीसह ग्रामीण विकासासाठीच्या तरतुदी निराशाजनक'

सामाजिक क्षेत्रासाठी अपुरी तरतूद...

सामाजिक क्षेत्रासाठी केलेल्या तरतूदी अपुऱ्या आहेत. देशाच्या लोकसंख्येचा अर्धा हिस्सा असलेल्या महिला व बाल विकासासाठी भरीव तरतूद अपेक्षित होती. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग लोकांच्या हितासाठी देखील फारसे काही केलेले दिसत नाही. नाही म्हणायला अर्थमंत्र्यांनी बँकातील पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवीला विमा संरक्षण देऊन सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचे प्रयत्न केल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राची घोर निराशा

या अर्थसंकल्पाने देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्रावर पुर्ण अन्याय केला आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांच्या विकासाला, मेट्रोला अपेक्षित असलेले अर्थबळ या अर्थसंकल्पातून दिले गेल्याचे दिसून येत नाही. उपनगरीय सेवा ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे, तिचा आणि प्रस्तावित रेल्वे लाईनच्या विकासाचा कुठलाही उल्लेख अर्थसंकल्पात नाही. दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या जुन्याच उल्लेखांशिवाय या अर्थसंकल्पाने राज्यातील रेल्वे विकासाला कोणतीही गती दिलेली दिसत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हेही वाचा... अर्थसंकल्पाचे उद्योग जगताकडून स्वागत, पुण्यातील मराठा चेंबर्समधील तज्ञांच्या प्रतिक्रिया

मुंबईकडे पूर्ण दुर्लक्ष...

देशात पाच हिस्टॉरिकल साईटचा “आयकॉनिक साईट” म्हणून पुनर्विकास करण्याचा संकल्प अर्थमंत्र्यांनी केला आहे, त्यात सांस्कृतिकदृष्टीने संपन्न असलेल्या महाराष्ट्राच्या कोणत्याही साईटचा उल्लेख नाही. महाराष्ट्राबाबतचा हा दुजाभाव ठळकपणे या अर्थसंकल्पातून दिसून आला आहे. गुजरात मधील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राला अधिक बळकटी देतांना मुंबईसारख्या देशाच्या विकासात सर्वाधिक योगदान देणाऱ्या शहराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचेही दिसून येते. याची खंत मुंबईकर आणि महाराष्ट्राला नेहमी राहील असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अर्थसंकल्पावरील प्रतिक्रियेत म्हटले आहे.

Last Updated : Feb 1, 2020, 11:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details