महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लोकल सुरू करण्याचा निर्णय जबाबदारीचे भान राखूनच- मुख्यमंत्री

कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागात शिथिलता आणली आहे. लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जातो आहे. सगळेच बंद राहील, असे नाही. सर्व जबाबदारीचे भान राखूनच लोकल सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत विरोधकांना कानपिचक्या दिल्या.

मुख्यमंत्री
मुख्यमंत्री

By

Published : Aug 5, 2021, 5:03 PM IST

मुंबई- कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागात शिथिलता आणली आहे. लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न सातत्याने विचारला जातो आहे. सगळेच बंद राहील, असे नाही. सर्व जबाबदारीचे भान राखूनच लोकल सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत विरोधकांना कानपिचक्या दिल्या. खार एच पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आदी उपस्थित होते.

लोकलचा निर्णय भान ठेवून -
मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सर्वसामान्यांसाठी बंद आहे. लोकल सुरू करावी यासाठी अनेक संघटना आक्रमक झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्रातील परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी सुधारली आहे. काही ठिकाणी चिंता करायला लागू नये अशी आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी देण्यात आली नाही. याचा अर्थ असा नाही की हे कायमचे बंद राहील. लोकल सुद्धा सुरू होणार, यावर विचार सुरू असून जबाबदारीचे भान ठेवूनच निर्बंध उठवले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

'व्यापाऱ्यांनी संयम सोडू नये'

काही जिल्ह्यातील दुकानांच्या वेळांनाही शिथिलता दिली आहे. इतर गोष्टींनाही शिथिलता मिळेल. जिथे जिथे लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता देऊ शकलो नाही, तिथल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांनी संयम सोडू नये, अशी विनंती मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. कोणी दुश्मन आहे आणि कोणी लाडके आहेत, असे काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी असल्याने या गोष्टी कराव्या लागत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

पालिका कर्मचाऱ्यांमुळेच आपण आहोत -
कोरोना म्हटले की पॉझिटिव्ह-निगेटिव्ह केले जाते. मात्र कोरोनाला पॉझिटिव्हली घ्यायला हवे. कोरोनाने आपल्याला खूप काही शिकवले. त्याचा विचार सर्वांनीच करायला हवा. काही अनावश्यक गोष्टी कशा टाळायच्या, गर्दी करू नये, त्रिसूत्री आदी गोष्टी कोरोनाने आपल्याला शिकवल्या आहेत. तर दुसरीकडे सर्वजण घरी असताना पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर होते. ते होते म्हणून आपण रस्त्यावर येऊ शकतो हे त्यांचे आपल्यावर ऋण आहे. पालिका कर्मचाऱ्यांनाही जीव आहे. त्यांनाही कुटुंब आहे. पण तरीही कठिण काळात पालिकेने काम केले ते अद्वितीय आहे. आपण आपले मुंबई मॉडेलही तयार केले. त्याची जगानेही दखल घेतली. आपण करून दाखवले. आजही कोरोनावर उपचार नाही. पण धाडसाने मॉडल तयार केले, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्र्यानी काढले. तसेच संकट फार मोठे होते. अजूनही ते रोरावत आहे. हे संकट गेलेले नाही. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

त्या महापालिका आपल्या ताब्यात नाहीत -
कोरोनाचे संकट असतानाच मुंबईवर नैसर्गिक आपत्ती येत आहे. प्रचंड पाऊस आणि दरडीही कोसळत आहेत. जगभरात पूर येत आहे. पाऊस होत आहे. बिजींगची महापालिका आपल्या ताब्यात नाही. देशभरात जिथे जिथे पूर आले असतील त्या महापालिका आमच्या ताब्यात नाहीत. पण तिथेही पूर आला. त्याला जबाबदार कोण? असे तिकडचे लोक बोलत असतील, असा चिमटा मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.

हेही वाचा -एकमेकांची पाठ खाजवतात, तेच महाविकास आघाडीचे जास्त आवडते - अमृता फडणवीस

ABOUT THE AUTHOR

...view details