महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पत्राचाळ संघर्ष समितीला घर व भाडे देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - mumbai latest news

प्रस्ताव पुढच्या 15 दिवसांत कॅबिनेटच्या बैठकीत ठेवू, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी रहिवाशांना दिल्याची माहिती राजेश दळवी, रहिवासी यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनंतर आता साखळी उपोषण मागे घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Patrachawl
Patrachawl

By

Published : Feb 18, 2021, 6:05 PM IST

मुंबई - भाडेपोटीची 125 कोटींची थकबाकी मिळावी आणि लवकरात लवकर हक्काच्या घराचा ताबा मिळावा या मागणीसाठी तीन दिवसांपासून पत्राचाळ संघर्ष समितीच्या माध्यमातून पत्राचाळीतील रहिवाशांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाची अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. त्यानुसार रहिवाशांना हक्काचे आणि भाडे ही मिळेल. या दोन्ही गोष्टी कशा करायच्या, पुनर्विकास कसा मार्गी लावायचा यासाठीचा प्रस्ताव पुढच्या 15 दिवसांत कॅबिनेटच्या बैठकीत ठेवू, असे ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी रहिवाशांना दिल्याची माहिती राजेश दळवी, रहिवासी यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनंतर आता साखळी उपोषण मागे घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मंगळवारपासून सुरू होते आंदोलन

पत्राचाळ पुनर्विकासात मोठा घोटाळा, अर्थिक फसवणूक झाली आहे. तर दुसरीकडे रहिवासी 13 वर्षे बेघर आहेत. अशात मागील तीन वर्षांपासून म्हाडाच्या हाती पुनर्विकास प्रकल्प आला असतानाही म्हाडा ही वेळकाढूपणा करत आहे. महत्त्वाचे म्हणजे रहिवाशांचे 125 कोटीचे भाडे थकले आहे. हे भाडे कोण आणि कधी देणार यावर म्हाडा बोलताना दिसत नाही. त्यामुळे म्हाडाच्या या उदासीन धोरणाविरोधात मंगळवारपासून रहिवाशांनी साखळी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही घेतली होती. आंदोलनकर्त्यांची भेट घेत हा विषय अधिवेशनात उचलू, असे आश्वासन दिले होते. दरम्यान आज साखळी उपोषणाचा तिसरा दिवस होता.

मुख्यमंत्र्यांकडून शिष्टमंडळाला निमंत्रण

पत्राचाळ रहिवाशांच्या या आंदोलनाची दखल आज मुख्यमंत्र्यांनीही घेतली. दुपारी अडीच वाजता पत्राचाळ संघर्ष समितीच्या 5 सदस्यांच्या शिष्टमंडळाला त्यांनी सह्याद्री अतिथी गृहावर भेटीसाठी बोलावले होते. त्यानुसार सुभाष देसाई यांच्यासमवेत पाच जण भेटीला गेले. यात राजेश दळवी, पंकज दळवी, सुरेश व्यास, मकरंद परब आणि नरेश सावंत यांचा समावेश होता. बिल्डरने कसे आपल्याला इतकी वर्षे बेघर ठेवले आणि आता म्हाडा कसे दुर्लक्ष करत आहे याची व्यथा यावेळी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.

'कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणू'

मुख्यमंत्री पत्राचाळ पुनर्विकासाबाबत आम्ही सकारात्मक आहोत. लवकरात लवकर पुनर्विकास मार्गी लावू. यासाठी काय करावे लागेल यासंबंधीचा अहवाल संबंधित विभागाकडून तयार करून घेत पुढील 15 दिवसात तो कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी ठेऊ, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. या आश्वासनावर रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यानुसार या आंदोलनाच्या ठिकाणी सर्व रहिवाशांनी जमत तूर्तास साखळी उपोषण मागे घेतले आहे. हक्काचे घर आणि भाडे दोन्ही रहिवाशांना मिळेल, अशी शाश्वती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याने रहिवासी खुश आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details