मुंबई- ओबीसी समाजाचा इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे काम समर्पित आयोग करत असले तरी, आडनावाच्या आधारावर इम्पेरिकल डेटा गोळा केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांनीही केला आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समर्पित आयोग इम्पेरिकल डेटा गोळा करत असल्यास संदर्भात सायंकाळी सहा वाजता शासकीय निवासस्थान वर्षा येथे तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ, मंत्री विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
ओबीसी इम्पिरिकल डाटाबाबत जे रिपोर्ट आले आहेत ते थोडे धक्कादायक आहेत. आडनावाच्या आधारे घरात बसून कोण माहिती घेत असेल तर हे चुकीचे आकडे येतील आणि हे चुकीचे आकडे केवळ या आरक्षणासाठी नाही तर पुढच्या सर्वप्रकारच्या आरक्षणासाठी हा ओबीसींवर फार मोठा अडचणीचा विषय ठरेल,ओबीसींची कत्ल होऊन जाईल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर याबाबत तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावले आहे.