मुंबई -राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतले घटक पक्ष आपला जाहीरनामा काढत असतानाच सत्ताधारी शिवसेना आणि भाजप युतीचे घोंगडे अजूनही भिजत पडले आहे. भाजप आणि शिवसेनेच्या युतीची मलाही काळजी आहे. लवकरच याबाबतचा योग्य निर्णय घेतला जाईल. तसेच खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा ही होईल, त्यासाठी थोडी वाट पाहा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची विधानसभेच्या जागावाटपाची बोलणी सुरू आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही एका फॉर्मुल्यावर दोन्ही पक्षांचे एकमत होताना दिसत नाही. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या रविवारच्या मुंबई दौऱ्यादरम्यान ही बोलणी पुढे जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, शाह यांनी मातोश्रीचे नावही घेतले नाही. युतीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारणा केली असता त्यांनी लवकरच युतीचा योग्य निर्णय घेतला जाईल. दोन्ही पक्षात ठरलेले फॉर्मुले सांगितले जातील, असे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत आपला रोख केवळ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच केलेल्या आर्थिक घोषणांवर होता. देशात बदललेल्या धोरणाचा महाराष्ट्राला लाभ होईल, असेही त्यांनी सांगितले.