मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य टास्क फोर्समधील तज्ञांशी कोरोना प्रादुर्भाव संदर्भात संवाद साधला. राज्यभरातील डॉक्टरांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांकडून आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केद्रांतील कोरोना उपचारसंबंधी चर्चा झाली. तसेच "माझा डॉक्टरांनी" गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य उचलावे, असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले. कार्यक्रमात सहा मिनिटाच्या वॉकचे महत्त्व , रुग्णांची ऑक्सिजनची गरज, बुरशीमुळे होणाऱ्या म्यूकरमायकोसिस आजारावरील उपचार, रेमडेसिवीरचा वापर, व्हेंटिलेटरवरील रुग्णांची कशी काळजी घ्यावी तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहण्यासाठी काय करावे, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. टास्क फोर्समधील डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. आशिष भूमकर यांनी मार्गदर्शन केले.
'माझा डॉक्टरांनी गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य उचलावे'
राज्यभरातील डॉक्टरांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांकडून आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना उपचारसंबंधी चर्चा झाली. टास्क फोर्समधील डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहूल पंडीत, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. आशिष भुमकर यांनी मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चर्चेदरम्यान केलेल्या निवेदनातील ठळक मुद्दे-
- कोरोना विरुद्धची लढाई लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी "माझा डॉक्टर" म्हणून ज्यांची ओळख आहे, अशा फॅमिली डॉक्टरांनी समोर यावे. रुग्ण सर्वात जास्त विश्वास आपल्या कुटुंबाच्या डॉक्टरांवर ठेवतात. त्यामुळे 'माझ्या डॉक्टर'ने गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या उपचाराचे शिवधनुष्य उचलावे.
- कोरोनामुळे रुग्णांच्या शरीरातील साखर वाढते. रुग्णास मधुमेह असेल तर स्थिती आणखी बिकट होते. हे लक्षात घेऊन रुग्णाच्या रक्तातील साखर मर्यादित आणि स्थिर ठेवणे गरजेचे असते. हे आव्हानात्मक काम आहे. त्यामुळे फॅमिली डॉक्टरांनी याकडे लक्ष देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 'माझा डॉक्टर'ने त्यांना शक्य असेल तर परिसरातील जम्बो कोविड केअर सेंटरमध्ये सेवा द्यावी. त्यामुळे शासनाला सहकार्य होईल आणि रुग्णांना देखील आनंद मिळेल.
- पावसाळा उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. पावसाळ्यात अनेक साथीचे आजार येतात. या साथीच्या आजारांना रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. त्यात माझा डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या फॅमिली डॉक्टरची भूमिका खूप महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
- आज सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे बंद आहे. मग देव कुठे दिसतो, तर तो तुमच्यात दिसतो. तुम्ही देवदूत होऊन लढाईत उतरा, आपण कोविड विरुद्धची ही लढाई नक्कीच जिंकू, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.