मुंबई - मुंबई आणि उपनगरातील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत लवकरच सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. बोरिवली पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालयासमोर असलेल्या पोलीस वसाहतीला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी या इमारतीच्या सद्यस्थितीची पहाणी केली.
सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांसोबत या विषयावर बैठक घेण्यात येणार - यावेळी बोलताना पोलीस वसाहतींचा प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित असून त्यावर तोडगा काढण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील आपली चर्चा झालेली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. मागे याबाबत धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपदी बसल्यानंतर या प्रश्नात पुन्हा एकदा लक्ष घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल. यासाठी लवकरच गृह विभागातील सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांसोबत या विषयावर बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यासमयी बोलताना दिली.