मुंबई - गेल्या ३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची व देवेंद्र फडवणीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता महिना झाला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून मुख्यमंत्री शिंदे यांनी पाचवेळा दिल्लीवारी केली आहे. ( Chief Minister Eknath Shinde visit to Delhi ) तरीही मंत्रिमंडळाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल होणार आशा बातम्या दिवसभर सुरू होत्या. परंतु, एनवेळी त्यांनी तो दौरा रद्द केल्याचे सांगितले. तरीही बुधवारी रात्री सर्वाना हुलकावणी देत मुख्यमंत्री दिल्लीला गेले व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ते गुरुवारी पहाटे मुंबईत परतले अशा चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. याप्रसंगी विमानतळावर मोजक्या अधिकाऱ्यांशिवाय कोणीही नव्हते असेही सांगितले जात आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच त्यांची ही दिल्लीवारी झाल्याचंही सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर ४ वेळा केली आहे दिल्लीवारी! - परंतु या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी मी बुधवारी रात्री दिल्लीला गेलो नाही. या सर्व अफवा आहेत, असे सांगितले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही बुधवारी रात्री मुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी झाली नसल्याचे सांगण्यात आलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी या अगोदर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा ८ जुलैला ते दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत दिल्लीत गेले होते. त्यानंतर १९ जुलैला शिवसेना खासदारांच्या भेटी घेण्यासाठी ते दिल्लीमध्ये दाखल झाले होते. यादरम्यान त्यांनी शिवसेनेच्या १२ बंडखोर खासदारांशी भेट घेतली.