मुंबई- राज्यात बंडखोर नेते एकनाथ शिंदे व भाजप यांचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता खाते वाटपावरून चर्चा रंगू लागलेल्या आहेत. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती मंत्रीपद त्याच बरोबर भाजपला किती मंत्रीपद देण्यात यावीत याबाबत शुक्रवारी (दि. 1 जुलै) रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या अग्रदूत या निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी भेट देऊन याविषयी सविस्तर चर्चा केल्याची माहिती पुढे येत आहे.
मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसयांनी शपथ घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळाचे गठन लवकरच करण्यात येणार आहे. याबाबत दोन्ही बाजूंच्या आमदारांना मंत्रीपद दिली जाणार आहेत. परंतु ही मंत्रीपद देत असताना खाते वाटपाबाबत मात्र अजूनही घोळ सुरू आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जवळपास दीड तास या विषयावर चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे. दोन दिवसांपूर्वी संपूर्ण भाजपला नाही तर राजकीय वर्तुळात मोठा धक्का खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी देत मुख्यमंत्री म्हणून बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले होते. आता नवीन मंत्रिमंडळ स्थापन होत असताना एकनाथ शिंदे यांच्या गटाला किती मंत्री पद व कुठली खाती दिली जातात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. त्याचबरोबर अपक्ष व समर्थक असलेल्या आमदारांना सुद्धा दोन्ही बाजूंकडून मंत्रीपद दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2019 मध्ये शिवसेनेकडे ही कॅबिनेट खाती -महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडे उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा. नगर विकास सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), उच्च व तंत्र शिक्षण, कृषी, माजी सैनिक कल्याण, वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, पाणीपुरवठा व स्वच्छता रोजगार हमी, फलोत्पादन, परिवहन, संसदीय कार्य, जलसंधारण, पर्यटन, पर्यावरण राज्य शिष्टाचार ही कॅबिनेट खाती होती.
शिवसेनेकडे राज्यमंत्रीपद -महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमीन, गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास उद्योजकता, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन ही खाती होती.