मुंबई - विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच भाजप कार्यालयात उत्साह कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पक्षाच्या मुंबई कार्यालयात मोठया जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत प्रदेशाध्यक्ष
चंद्रकांत पाटील व भाजपचे शहराध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी एकमेकांना लाडू भरवून आनंदोत्सव साजरा केला. यानंतर संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी रात्रंदिवस काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यासोबतच शिवसेना, आरपीआय, शिवसंग्राम, रासप आणि सर्व मित्रपक्षाचे त्यांनी आभार मानले.
जनतेने दिलेला कौल मान्य, अधिक जोमाने काम करून करून कामे पूर्ण करणार - देवेंद्र फडणवीस लोकांनी दिलेला कौल आपल्याला मान्य असून, महायुतीला सरकार स्थापनेसाठी स्पष्ट बहुमत दिल्याने पुन्हा एकदा सरकार स्थापन करून बाकी राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
काही महत्वाच्या जागा हातून गेल्या असल्या, तरीही स्ट्राईक रेटचा विचार करता तो मागील निवडणुकीच्या तुलनेत निश्चितच चांगला होता, असे ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपवर विश्वास दाखवलेल्या मतदारांचे आभार व्यक्त करून त्यांनी कोथरूडच्या जनतेचेही आभार मानले आहेत. तसेच मतदारांची अपेक्षापूर्ती करण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.