मुंबई - हुतात्मा दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. कर्नाटक व्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही मुख्यमंत्र्यांनी आपल्या अभिवादनात केला. कर्नाटक सीमा भागातलं शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी व निर्धारानं लढत रहाणं हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हणाले, की महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी प्राणपणाला लावणाऱ्या सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आजच्या हुतात्मा दिनी विनम्र अभिवादन. सीमा प्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्पणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबियांना मानाचा मुजरा..!
कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत. या अभिवचनासह हूतात्म्यांना विनम्र अभिवादन!
..हीच हुतात्म्यांना श्रद्धांजली- अजित पवार
बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमाभागातील सर्व मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करुन संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्वशक्तीनिशी, निर्धारानं लढत रहाणं, हीच सीमालढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमालढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले. सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, वर्ष 1956 मध्ये आजच्याच दिवशी, बेळगाव, कारवार, बिदरसारखी मराठी गावे तत्कालिन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. सीमाभागातील मराठी बांधवांवर व महाराष्ट्र राज्यावर त्यावेळी झालेला अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरु आहे. हा लढा यशस्वी होईपर्यंत समस्त मराठी बांधव सर्वशक्तीनिशी, एकजुटीनं लढतील. संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणाऱ्या आंदोलकांवर, दि. 18 जानेवारी 1956 रोजी मुंबईत गोळ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यात महाराष्ट्राचे १० सुपुत्र शहीद, तर अडीचशेहून अधिक जण जखमी झाले होते.
संयुक्त महाराष्ट्रासाठी शहीद झालेल्या त्या महाराष्ट्रवीरांनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले आहे. आंदोलनात जखमी झालेल्या सैनिक व त्यांच्या कुटुंबियांबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. कर्नाटक सीमाभागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.