मुंबई - देशभरात इंधनाचे दर वाढले आहेत. महागाई वाढली आहे. यामुळे भाजीपाला तसेच अन्नधान्य यांच्या किमती वाढल्या आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांना भाजीपाला, फळांसाठी कंत्राटदारांनी महागाईचा विचार न करता त्यांचा स्वस्त दरांत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
बाजारभावापेक्षाही कमी दर -
मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील रुग्णांना पालिकेकडून सकस अन्न पुरविण्यासाठी निविदा मागविल्या जातात. त्यानुसार, २ जानेवारी २०२३ पर्यंतच्या पुरवठ्यासाठी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यातील। लघुत्तम निविदा सादर करणाऱ्या कंत्राटदाराने गेल्यावेळच्या काही घटकांच्या खरेदी दरांपेक्षा कमी आणि सरासरी बाजारभावापेक्षाही कमी दर दिल्याने त्यास पसंती दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेला याचा फायदा होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
इतक्या दरात वस्तू -
पालिका रुग्णालयांत भाजीपाला, फळे पुरवठ्यासाठी यापूर्वीही कमी दराने निविदा आल्या असून त्यावर टीकेचा सूर उमटला होता. आताही कमी दराने पुरवठा केला जाणार आहे.यात १५ रुपये ६३ पैसे किलो दराने केळी, ८.४३ रुपये किलो वांगी, ९.४१ रुपये कोबी, १७.८५ रुपये फ्लॉवर, ९.३८ रुपये दुधी, ५ रुपये किलो लाल भोपळा, मोसंबी ४५ रुपये किलो अशा दरांत पुरवठ्याची तयारी दर्शविली आहे. यात इतर काही वस्तूही स्वस्त दरात पुरवठा करण्यात आली आहे.