मुंबई - मुंबईतील चाळ संस्कृती ही मुंबईची महत्तवाची ओळख मानली जाते. मुंबई अनेक घटनांची साक्षीदार चाळ असते. घराची, स्वभावाची, चेहऱ्यांची, संस्कृतीची ओळख घडविणारी ‘चाळ’ संस्कृती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईसह उपनगरात सुमारे 20 हजार चाळी पुनर्विकासाच्या कचाट्यात रखडल्या आहेत. पत्राचाळ प्रकरणानंतर चाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने ते नांदू लागले- मुंबईतील चाळ संस्कृती जगप्रसिध्द आहे. चाळीमध्ये 2 खोल्यांची एक निवासी जागा, तेथे प्रवेशासाठी एक सामाईक लांबच्या लांब गॅलरी, एक अरुंद जिना, आठ- दहा फुटांच्या व्हरांड्यात लगत एक शंभर चौरस फुटांची खोली व लागूनच ऐंशी स्क्वेअर फुटांचे स्वयंपाकघर असते. एका टोकाला शौचालये अशा या चाळींच्या संस्कृतीने भल्याभल्यांना नादाला लावले आहे. कोकणातून चाकरमानी, घाटावरुन घाटी मुंबईत आले. कालांतराने व्यापार घेऊन गुजराती आले. वर्षानुवर्षे मुंबईत गुण्यागोविंदाने ते नांदू लागले आहेत. त्यामुळे चाळी आणि चाळीतले जीवन याबद्दल मराठी, गुजराती संस्कृती कर्मींना आजही आपुलकी आहे. चाळीतले जगणे त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाचा, अस्तित्वाचा भाग आहे. चाळीत राहण्यामागे घरभाडे अत्यंत कमी आणि कामाच्या ठिकाणापासून राहण्याचे ठिकाण सोयीस्कर अंतरावर आहे. सहज चालत ये- जा करण्यासारखे आहे. शिवाय, गिरणगाव असो किंवा अन्य भागात आपल्या नात्यातील, पंचक्रोशीतील लोकांची मोठी वस्ती होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक चाळीत राहत असतं.
सलोख्याचं दर्शन घडविणारे - चाळीतले सण-समारंभ, चाळीतल्या आठवणी, शेजारी, चाळीतल्या मित्र- मैत्रिणी, सार्वजनिक उत्सव, हळदी- कुंकू समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, लहान मुलांचे वाढदिवस, आनंद, दु:ख, विनोद, गाण्यांच्या मैफली, गाण्याच्या भेंड्या, एका कट्यावर बसून रंगणाऱ्या गप्पांचा फड, नळावरील पाणी भरताना होणारी किरकोळ भांडणे आणि त्यानंतर पुन्हा एकत्र होणारी कुटुंब ही चाळीतील सलोख्याचेच दर्शन घडविणारी आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव, दहीहंडी उत्सवांच्या निमित्ताने चाळीतील युवा वर्ग हिरीरीने सहभागी होताना दिसतोय.
चाळींचा मुद्दा चव्हाट्यावर -बदलत्या कालानुरुप सध्या चाळीचे स्वरूप आज बदलत आहेत. चाळ संस्कृती जाऊन टॉवर संस्कृती आता रुजत आहे. शंभर वर्षे उलटून गेलेल्या सुमारे 19 हजार 742 चाळी मोडकळीस आल्या आहेत. म्हाडा प्राधिकरणाने या चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जवळपास 5 हजार चाळींचा पुनर्विकास झाला. उर्वरित 13 हजार 91 चाळी आजही पुनर्विकासाच्या कचाट्यात सापडल्या आहेत. बिल्डरांनी पुनर्विकासाच्या नावाखाली घरे रिकामी केली आहेत. अनेक ठिकाणी संक्रमण शिबीर बांधण्यात आली. ती देखील मोडकळीस आल्याचे स्थिती आहे. त्यात चाळींचा पुनर्विकास वर्षानुवर्षे रखडला नाही. पत्राचाळ प्रकरणानंतर जीर्ण झालेल्या चाळींचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे.