मुंबई- तोंडास फेस; कोणाच्या? या मथळ्याखाली शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. सामनाच्या या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहून उत्तर दिले आहे. तेही आजच्या (बुधवार) 'सामना'ने जसेच्या तसे प्रकाशित केले आहे. 'शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत, धन्यवाद' या शिर्षकाने हे पत्र सामनामध्ये प्रकाशित झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीलाच राऊत हे माझ्या बरोबरीचे नसतानाही प्रोटोकॉल बाजूला ठेवून हे आभाराचे पत्र लिहित असल्याचे म्हणत राऊतांना टोला लगावला आहे.
काय म्हटले आहे पत्रात..
'सामना'ने दि. 21 सप्टेंबर रोजी लिहिलेल्या अग्रलेखाबद्दल हे आभार आहेत. वृत्तपत्राचा अग्रलेख हा संपादकाच्या नावे ओळखला जातो आणि 'सामना'च्या संपादक रश्मी उद्धव ठाकरे आहेत. तथापि, आपण कार्यकारी संपादक आहात आणि आपणच अग्रलेख लिहिता असा सार्वत्रिक समज असल्याने तुमचे आभार मानले.
'तुम्ही माझ्यावर या अग्रलेखात बरीच चिखलफेक केली आहे. पण तुम्हाला मी जाब देणे प्रोटोकॉलनुसार योग्य नाही. म्हणजे राजकीयदृष्ट्या बरोबरी नाही, अशा अर्थाने शब्द वापरला. नुकतेच मी एका नेत्याबद्दल पाठीत खंजीर खुपसला, असा वाक्प्रचार वापरला तर तुम्ही पाठीत खंजीर खुपसल्याचा पुरावा मागितला. पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे विश्वासघात करणे एवढाही अर्थ तुम्हाला संपादक असून माहिती नाही. त्यामुळे प्रोटोकॉल शब्द का वापरला हे सांगितले. विशेष म्हणजे तुमच्या पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही आज हाच वाक्प्रचार वापरला. मी हा वाक्प्रचार वापरल्यानंतर तुमच्या पक्षातील लोकांचे धाडस वाढलेले दिसते.' असा खोचक टोला शिवसेनेला लगावला आहे.
'मी तुम्हाला उत्तर देणे प्रोटोकॉलनुसार योग्य नाही'
'मी तुम्हाला उत्तर देणे प्रोटोकॉलनुसार योग्य नाही, असे म्हणण्याचे कारण की, मी महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझ्या अध्यक्षतेखाली भाजपाने तुमच्या पक्षासोबत युती करून विधानसभा निवडणूक पूर्ण बहुमताने जिंकली आहे. मी पाच वर्षे राज्याचा कॅबिनेट मंत्री होतो. आयुष्यातील उमेदीच्या काळात तारुण्यातील अनेक दशके अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम केले आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी माझ्यावर टीका केली तर मी त्याला उत्तर देणे हे बरोबरीचे झाले असते. ते राजकारणातील प्रोटोकॉलला धरून झाले असते. पण तुमचे तसे नाही. तरीही तुमचे आभार मानतो.' चंद्रकांत पाटलांनी असा चिमटा राऊतांना काढला आहे.
'तसे तुमचे आभार मानण्याचे बरेच दिवस डोक्यात होते. कारण तुम्ही वारंवार मला अग्रलेखातून लक्ष्य करता. तुम्ही अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या बडय़ा नेत्यांवर टीका करता आणि माझ्यावरही टीका करता, त्यामुळे मला बडय़ा नेत्यांच्या रांगेत नेण्याचा सन्मानही देता. त्याच पद्धतीने आज तुम्ही 'तोंडास फेस, कोणाच्या ?' या शीर्षकाचा अग्रलेख लिहून मला पुन्हा प्रसिद्धी मिळवून दिली आहे. आता मात्र तुमचे आभार मानलेच पाहिजेत असे वाटल्याने हे पत्र लिहिले.' असे उपरोधिक चिमटेही चंद्रकांत पाटील यांनी या पत्र लिहण्यामागील कारणांची मिमांसा करताना राऊत यांना काढले आहेत.
'ईडीचा अनुभव येण्यासाठी काळा पैसा असावा लागतो'
चंद्रकांत पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला, या सामनाच्या सवालावर चंद्रकांत पाटील यांनी दीर्घ उत्तर दिले आहे. ते लिहितात, 'तुम्ही अग्रलेखात लिहिले आहे की, 'भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ यांना धमकावले आहे की, ईडीशी लढताना तोंडाला फेस येईल. पाटील यांना ईडीचा अनुभव कधीपासून आला?' संजयराव तुमचा प्रश्न रास्त आहे. मला ईडीचा अनुभव नाही. तो येण्यासाठी भरपूर काळा पैसा असावा लागतो. आर्थिक गैरव्यवहार केले की, ईडीचा अनुभव येतो. तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. अखेर बरीच धावपळ करून, ते पैसे परत देऊन प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न तुम्ही धापा टाकत केलात. हे सर्व पाहिल्यावरून मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर 127 कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असे त्रैराशिक मांडून मी अंदाज बांधला, पण मला ईडीचा अनुभव नाही हे मात्र खरेच आहे.'