मुंबई -भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभरात धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजप आक्रमक झाली आहे. आज आझाद मैदानावर पुकारलेल्या धरणे आंदोलाननंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपच्या एल्गार मोर्चाने सरकार हादरल्याचे सांगितले. तसेच सरकारविरोधात जवळपास अडीच लाख लोक रस्त्यावर उतरल्याची माहिती त्यांनी दिली.
पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना महाविकास आघाडीच्या सावरकरांवरील भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आले. याला प्रत्युत्तर देताना, आम्हाला सावरकरांचा अभिमान आहे, त्यांना आहे की नाही, हे उद्या कळेल असे ते म्हणाले. तसेच समृद्धी महा मार्गावर बोलताना, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांनी सरकारला आव्हान दिले आहे. याचसोबत सरकार देखील याला जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.