मुंबई- मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यानंतर भाजपा विरूद्ध ठाकरे सरकार असा सामना सुरू झाला आहे. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने विधानसभेत केलेला कायदा हा फूलप्रुफ नव्हता, असे मत ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी व्यक्त केले. त्यावर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.
'मराठा आरक्षणाचा खून काँग्रेस-राष्ट्रवादीने केला'
देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यवाही करून मराठा आरक्षण दिले होते. सुप्रीम कोर्टाने त्यावेळी त्याला स्थगिती दिली नाही. या आरक्षणाचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने खून केला आहे. सुप्रीम कोर्टाचे जजमेंट वाचल्यावर कळते की शासनाने जिद्दीने केस लढवली नाही. पण आता भाजपाने मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अंतर्गत समिती नेमली आहे. मी त्या समितीचा अध्यक्ष आहे. यात आशिष शेलार, प्रवीण दरेकर, विनायक मेटे, नरेंद्र पाटील, श्रीकांत भारतीय हे नेते आहे, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली.