मुंबई -महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कारभारात महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळालीच नाही, तर उलट या वर्षभरात सरकामधील अनेक मंत्र्यांचे कारनामे, भानगडी व मुजोरपणा राज्यातील जनतेसमोर उघड झाला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला शरमेने मान खाली घालावी लागत आहे. आघाडीच्या या रिक्षा सरकारच्या तीन चाकाला अनेक छिद्रे पडल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला कौल दिला असतानाही, बेईमानी लबाडी व लाचारी करून राज्यात आघाडीचे सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्राचा विकास करण्याचे स्वप्न त्यांनी राज्यातील जनतेला दाखवले. पण राज्याचा विकास काही झाला नाही, या उलट त्यांनी भाजपने सुरू केलेल्या विकास कामांना स्थगिती दिली. हे स्थगीती सरकार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
ठाकरे सरकारमध्ये भानगडीबाज मंत्री
पुण्यातील पुजा चव्हाण आत्महत्येप्रकरणात ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यांचे नाव समोर आले आहे. मंत्र्यांचे तरुणीसोबत अनैतिक प्रेमसंबंध होते आणि त्यांनी विश्वासघात केल्यामुळे तरुणीने आत्महत्या केली अशा बातम्या सध्या प्रसारमाध्यमे देत आहेत. भाजपने हा मुद्दा उचलून धरल्यानंतरच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. ठाकरे सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्यांच्या विरोधात त्यांच्याच एका कथित प्रेयसीने बलात्काराचे आरोप केले आणि त्यांनीच स्वतः आपले अनैतिक संबंध आणि मुलं असल्याच्या भानगडीची कुबली दिली. याविरोधात संपूर्ण राज्यात निदर्शने झाली तरीही त्या भानगडीबाज मंत्र्यांनी अद्यापही राजीनामा दिला नाही. पण याप्रकरणाची चौकशी झाल्यानंतर निर्णय घेऊ, असे सांगत महाविकास आघाडीमधील जाणात्या राजाने त्या मंत्र्यांना पाठीस घातल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे.