मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना भाजप प्रदेशाध्य चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली आहे. सुप्रिया सुळेंवर पाटलांनी अत्यंत शेलक्या भाषेत टीका केली आहे. "तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. खासदार असून तुम्हाला कळत नाही. तुम्ही दिल्लीत जा नाहीतर मसणात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या", असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या राज्यातील तापमान चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरक्षणावरून टीकेची झोड एकमेकांवर उठवली जात आहे. आज भाजपने आक्रमक पवित्रा घेत मंत्रालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी यात सहभाग घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही यात सहभाग घेत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. तसेच, त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केलीये.