मुंबई -काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शेलक्या भाषेत टीका केली होती. “सत्तेची स्वप्न पाहू नका, आम्हीही तुमचे बाप आहोत”; असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावर राष्ट्रवादी नेते यांनी शशिकांत शिंदे यांनी “तुमच्या दिल्लीतील बापाला बाप म्हणायला वारसदार नाही आणि तुम्ही बाप काढायची भाषा करत आहात” असं म्हणत निशाणा साधला होता. तर अमोल मिटकरी यांनी ही चंद्रकांत दादांवर हल्ला करताना १०५ आमदार येवूनही विरोधीपक्षात बसायला लागलेल्या भाजपने खरा बाप कोण असतो ते पाहिले आहे असे ट्वीट केले होते. त्यावर आज पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "आम्ही शेतकरी, कामगार आणि कष्टकरी जनतेला आपले मायबाप मानतो, आज त्यांच्यामुळे आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहोत. शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या हिताच्या विधेयकांना विरोध करणाऱ्यांसोबत आम्ही सदैव लढा देऊ. दिल्लीत गेल्या सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसला आहे, हे तुम्हीसुद्धा पाहिलंय" असे प्रत्युत्तर दिले.