मुंबई -माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांचे कथित वसुली प्रकरणाचा आरोप लावण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगासमोर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना चांदीवाल आयोगासमोर 17 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर अँटिलिया स्फोटक स्कार्पियोमधील जिलेटिन प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसेच निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हेच मास्टरमाइंड असल्याचे वक्तव्य केले होते. त्या संदर्भात आयोगाने नवाब मलिक यांना नोटीस बजावली असून आयोगासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांचे कथित वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप करणारे पत्र लिहून खळबळ उडवून दिली होती. परमबीर सिंग यांनी हे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांना पाठवले होते. या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील बारमधून दर महिन्याला शंभर कोटी रुपयाचे वसुली टारगेट दिला होता, असा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही या प्रकरणात गेल्या काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी, याकरिता राज्य सरकारने चांदीवाल आयोगाची देखील स्थापना केली होती. त्यानंतर आयोग या सर्व प्रकरणाचा चौकशी करत आहे.
हेही वाचा -सायबर गुन्ह्यांची माहिती त्वरित पोलिसांना द्या, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचे मुंबईकरांना आवाहन