मुंबई - लोकल रेल्वेच्या हद्दीत 60 हून अधिक चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या राजू पाटील या अट्टल गुन्हेगाराला जीआरपी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रेल्वे पोलिसांच्या विशेष कृती दलाने केलेल्या कारवाईत तब्बल 23 गुन्हे उघडकीस आले असून, यामध्ये 11 लाख रुपये किंमतीचे दागिने हस्तगत केले आहेत.
60 गुन्हे करणाऱ्या सोनसाखळी चोरला अटक; सोने विकत घेणाऱ्या ज्वेलर्सवरही कारवाई
लोकल रेल्वेच्या हद्दीत 60 हून अधिक चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणाऱ्या राजू पाटील या अट्टल गुन्हेगाराला जीआरपी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 15 सोनसाखळ्या व 6 सोन्याच्या लगडी असा 11 लाख 57 हजारांचा ऐवज हस्तगत केला असून अधिक तपास सुरू आहे.
शहरातील लोकल रेल्वेच्या, पश्चिम, मध्य व हार्बर मार्गावर गेल्या काही महिन्यात झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास जीआरपी पोलिसांची टीम करत होती. अंधेरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या राजू मधुकर पाटील (वय-36) या आरोपीची रिमांड कस्टडी मिळवून जीआरपी पोलिसांनी चौकशी केली. यामध्ये आरोपीने गर्दीच्या वेळी चेन स्नॅचिंगचे तब्बल 23 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
आरोपीकडून सोन्याच्या साखळ्या विकत घेणाऱ्या नानासो थोरात या ज्वेलर्सला पोलिसांनी विरार येथून अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 15 सोनसाखळ्या व 6 सोन्याच्या लगडी असा 11 लाख 57 हजारांचा ऐवज हस्तगत केला असून अधिक तपास सुरू आहे.