मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यादरम्यान त्यांनी पुणे ते आळंदी पालखी मार्ग, तसेच इतर काही प्रकल्पांबाबत चर्चा केली. तसेच, राज्यात काही नवे महामार्ग मंजूर करण्यात आल्याची माहिती गडकरींनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात १०० वर्षे चालतील असे रस्ते..
गेल्या तीन वर्षांमध्ये राज्यात ३,७७१ किलोमीटर लांबीचे काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. हे रस्ते पुढील १०० वर्षे चालतील असे पक्के असल्याचे गडकरींनी सांगितले.
१२ हजार कोटींचा पालखी मार्ग..
पुणे ते आळंदी अशा पालखी मार्गाला मंजूरी मिळाली आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये या मार्गाचे काम सुरू होणार आहे. याचा एकूण खर्च १२ हजार कोटी असणार असून, भाविकांना चालताना त्रास होणार नाही याची या मार्गावर विशेष सोय असणार आहे, असे गडकरींनी सांगितले.
राज्यात नवे महामार्ग..
यासोबतच, राज्यात सूरत ते नाशिक, नाशिक ते नगर आणि सोलापूर ते हैदराबाद आणि पुढे चेन्नई अशा महामार्गाला मंजूरी मिळाली आहे. याचा एकूण खर्च सहा हजार कोटी असणार आहे. तसेच, मुंबईच्या सीमेपर्यंत येणारा महामार्ग आता जेएनपीटीपर्यंत नेणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. तसेच, नागपूर-हैदराबाद महामार्गही मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
१५ तारखेनंतर फास्टॅग अनिवार्य..
सध्या राज्यात ७५ टक्क्यांहून अधिक ठिकाणी फास्टॅग लावण्यात आले आहे. १५ जानेवारीनंतर फास्टॅग अनिवार्य करण्यात येणार असून, नागरिकांनी लवकरात लवकर ते बसवून घ्यावे असे आवाहन गडकरींनी केले.
मुंबई-गोवा महामार्ग..
येत्या एका वर्षात मुंबई ते गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होणार असल्याचे गडकरींनी सांगितले. या रस्त्याचे काम ७० टक्के पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा :खुशखबर! 11 जानेवारीपासून फास्टटॅगमध्ये 5 टक्के कॅशबॅक