मुंबई - मध्य रेल्वे मार्गावर जानेवारी ते जुलै या कालावधीमध्ये रेल्वे स्थानक, रेल्वे परिसरात हरविलेल्या, पळून आलेल्या, रस्त्या चुकलेल्या ४७७ मुलांची घरवापसी करण्यात रेल्वे सुरक्षा बलाला यश आले आहे. ज्यामध्ये रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरील ३१० मुले आणि १६७ मुलींचा समावेश आहे.
रेल्वे सुरक्षा बलाला यश -
बाहेरील राज्यातील मुलांना मुंबईचे आकर्षण असल्याने अनेक मुले आपले घर सोडून रेल्वेने मुंबई गाठतात. याचबरोबर रेल्वे परिसरात हरवलेल्या, रस्त्या चुकलेल्या मुलांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. यंदा जानेवारी ते जुलै २०२१ या कालावधीमध्ये अशाप्रकारे पळून आलेल्या ४७७ मुलांची घरवापसी केली आहे. या मुलांना रेल्वे परिसरातून ताब्यात घेत पुन्हा त्यांच्या राहत्या घरी सोडण्यात यश आले आहे.
१६७ मुलींचाही समावेश -
अनोळखी शहरात हरवल्याने गोंधळलेल्या मुलांची समजूत काढून त्यांना घरी सोडण्यात येते. काही मुले पालकांच्या निष्काळजीपणामुळे लहान मुले हरवतात, तर काही वेळेला मुलांचे अपहरण केले जाते. मध्य रेल्वेच्या सुरक्षा बलाच्या पथकाने अशा मुलांचा शोध घेऊन त्यांची घरवापसी केली आहे. यामध्ये मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरील ३१० मुले आणि १६७ मुलींचा समावेश आहे.
आरपीएफ जवानांचे कौतुक -
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी म्हणाले की, मध्य रेल्वे पळून गेलेल्या मुलांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या समजून घेऊन आणि त्यांच्या कुटुंबासोबत जाण्यासाठी समुपदेशन करून सामाजिक जबाबदारीची भूमिका बजावते. त्यांनी आरपीएफ आणि फ्रंटलाईन स्टाफचे कौतुक केले जे अशा प्रकरणांतील गांभीर्य ओळखून आणि समुपदेशक म्हणून त्वरित कारवाई करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
कोणत्या भागात किती मुले घरी परतली -
- मुंबई विभाग १६६ मुले (१०४ मुले आणि ६२ मुली)
- भुसावळ विभाग ७० मुले (३९ मुले आणि ३१ मुली)
- नागपूर विभाग ४० मुले (२२ मुले आणि १८ मुली)
- पुणे विभाग १७१ मुले (१३० मुले आणि ४१ मुली)
- सोलापूर विभाग ३० मुले (१५ मुले आणि १५ मुली)
हेही वाचा -अनिल देशमुख यांची ईडी बाबतीतली याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून स्विकृत