मुंबई -भारतीय रेल्वेचा पार्सल वाहतुकीतून सर्वाधिक महसूल मिळविण्यामध्ये मध्य रेल्वेने बाजी मारली आहे. मध्य रेल्वेने फेब्रुवारी-२०२२ या महिन्यात पार्सल वाहतुकीतून २८.१६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहेत. एप्रिल-२०२१ ते फेब्रुवारी-२०२२ या कालावधीत मध्य रेल्वेने पार्सल वाहतुकीतून २८८ कोटी मिळवले जे मागील वर्षी याच कालावधीत प्राप्त झालेल्या १३१.३४ कोटींच्या महसुलापेक्षा ११९ टक्के अधिक आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने ( Central Railway ) सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्ये पार्सल महसूलात आपले पहिले स्थान कायम ठेवले आहे.
नॉन-फेअर महसूलात मारली बाजी -रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पार्सल वाहतुकीतील वाढ मुख्यत्वे किसान रेलच्या ( Kisan Rail ) यशस्वीपणे चालवण्यामुळे झाली आहे. ज्यामुळे या भागातील नाशवंत वाहतूक देशाच्या दूरवरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचते. आर्थिक वर्ष २०२१- २२ मध्ये (एप्रिल-२०२१ ते फेब्रुवारी-२०२२), किसान रेलने विविध गंतव्यस्थानांवर ८४७ फेऱ्या केल्या आहेत. ज्यातून ३.०६ लाख टन वाहतूक करण्यात आली आहे. किसान रेलच्या सुरुवातीपासून आतापर्यंत १ हजार ७४ फेऱ्या चालवण्यात आल्या आहेत. ज्यातून ३.७८ लाख टन वाहतूक करण्यात आली. मध्य रेल्वे सर्व भारतीय रेल्वेत गैर-प्रवासी शुल्क (नॉन-फेअर) उत्पन्नामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. एप्रिल २०२१ - फेब्रुवारी २०२२ दरम्यान या गैर-प्रवासी शुल्क (नॉन-फेअर) उत्पन्नामधील महसूल २६.९२ कोटी आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत मिळवलेल्या महसुलापेक्षा १५१ टक्के अधिक आहे.