मुंबई -राज्यातील अनेक भागात पूरस्थिती आहे. पावसाच्या पाण्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी अनेक स्थरावरून केली जात आहे. यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री आणि मी मंत्रालयात सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहोत. पिक विम्याचे पैसे कसे मिळवून देता येईल, याबाबत विमा कंपन्याशी बोलणी सुरू आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारकडेही आम्ही मदतीची मागणी करत असतो, पण ती मदत कीती द्यायची, हा केंद्र सरकारचा अधिकार आहे. मात्र, मदतीचे आकडे बघितले. तर केंद्र सरकार राज्याच्या निधीवाटपात भेदभाव करते, असे जाणवत असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला.
काय म्हणाले अजित पवार -
मराठवाडाच्या अनेक भागात पुरजन्य परिस्थिती आहे. या संदर्भात अनेक मागण्या होत आहेत. मदत व पूर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि आम्ही सर्वजण या परिस्थिवर लक्ष ठेऊन आहोत. मुख्यमंत्री आणि मी मंत्रालयात सर्व आढावा घेत आहोत. तसेच पिकविम्याचे पैसे कसे मिळवून देता येईल, याचा ही आम्ही विचार करत आहोत. तसेच याबाबत पिकविमा कंपन्यांशीदेखील बोलणी सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच सर्व पालकमंत्री आपआपल्या जिल्ह्यात आहेत, असेही ते म्हणाले.