मुंबई -मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आज केंद्र सरकारच्यावतीने 102 घटना दुरुस्तीसंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. आरक्षण देण्याचे अधिकार राज्यालाच आहेत, असे स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने सांगितले. तर मोठा प्रश्न निकाली लागेल. या पुनर्विचार याचिकेवरील निर्णय लवकर लागला आणि सर्वोच्च न्यायालयाने हे अधिकार राज्यालाच आहेत, असे स्पष्ट केले, तर याचा फायदा निश्चित आपल्याला होईल, अशी प्रतिक्रिया मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढाई लढणारे विनोद पाटील यांनी दिली आहे.
राज्य सरकारने आपले म्हणणे लवकरात लवकर न्यायालयात दाखल करावे. तसेच समाज म्हणून आम्ही न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहोत. केंद्र सरकारचे म्हणणे न्यायालय सकारात्मक रितीने ऐकेल आणि आमचा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा विनोद पाटील यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षण रद्दचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय -
5 मेला सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने एकमताने राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाने 50 टक्के मर्यादेचे भंग होत असल्याचे स्पष्ट केले. मंडल आयोगाने ठरविलेल्या 50 टक्क्यांच्या मर्यादेबाहेर जाऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची कसलिही अपवादात्मक स्थिती नाही असेही न्यायालयाने म्हटले होते. मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणीनंतरचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण घटनाबाह्य ठरविले. तसेच मंडल आयोगाचा निर्णय व्यापक खंडपीठाकडे पुनर्विचारासाठी पाठविण्यासही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय घटनापीठाने हा निर्णय दिला होता.