मुंबई-संपूर्ण टाळेबंदी होण्याच्या भीतीने मुंबईत रोजगारासाठी आलेल्या मजुरांनी गावाकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेल्वे स्थानकांवर गर्दी करण्यात आली आहे. रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यासह 496 मेल-एक्स्प्रेस गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांसह मजुरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
रेल्वे प्रशासनाच्यावतीने नियमित गाड्यांसह उन्हाळ्यातील विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. त्यामुळे बाहेर राज्यात प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, अनेक गाड्यांच्या तिकिटांची प्रतिक्षा यादी दोनशे ते तीनशेपर्यंत आहे. गावाकडे जाण्यासाठी ठराविक गाडीचे तिकिट न मिळाल्याने अनेक प्रवासी टर्मिनस बाहेर थांबले होते. गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या सुमारास एलटीटीबाहेर प्रवाशांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले आहेत. अनेकजण गावाकडे जाण्याच्या आशेने स्थानकाबाहेर बसले होते. स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी होऊ नये म्हणून लांब पल्ल्याच्या गाड्या आणि उन्हाळ्यातील विशेष गाड्या चालविण्यावर भर देण्यात येत आहे.
हेही वाचा-महाराष्ट्राला स्वतंत्रपणे कोरोना लस खरेदी करू द्या; राज ठाकरेंचे थेट मोदींना पत्र
मध्य रेल्वेच्या 230 तर पश्चिम रेल्वेच्या 266 रेल्वे गाड्या-
मध्य रेल्वेद्वारे उन्हाळ्यानिमित्त आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपर्यंत 230 विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. तर पश्चिम रेल्वे मार्गावर 266 विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून अशा एकूण 496 विशेष मेल- एक्सप्रेस गाड्या चालवण्यात येत असल्याने प्रवाशांना आणि परप्रांतीय मजुरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे. प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे रेल्वे विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. फक्त आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाशांनी प्रवास करावा. प्रवाशांनी स्थानकावर गर्दी करून नये. तिकिटांच्या प्रतिक्षा यादीवर लक्ष ठेवून अतिरिक्त विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या 90 मिनिटांपूर्वी स्थानकावर येण्याचे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने समाज माध्यमावरून करण्यात आले आहे.