मुंबई - मुंबईत पुन्हा एकदा कोरोना विषाणूने (Corona Cases Hike in Mumbai) डोके वर काढले आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना सेलिब्रिटींच्या पार्ट्यांमधून कोरोनाचा प्रसार (Corona Spread Celebrities Parties) झाल्याचे समोर आले आहे. त्यातच मुंबईत ट्रेन, मार्केट आदी ठिकाणी गर्दी कमी झालेली नाही. यामुळे येत्या काळात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे येत्या काळात सेलिब्रिटींच्या पार्ट्या आणि गर्दी पालिकेच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढवणार आहे.
रुग्णसंख्या वाढली - मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या. या तीनही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. जानेवारी 2022 नंतर तिसरी लाट आटोक्यात आल्यावर रुग्णसंख्या कमी झाली. एप्रिल ते मे महिन्या दरम्यान रोज 50 पेक्षा कमी रुग्ण आढळून येत होते. मे महिन्याच्या शेवटी रोजची रुग्णसंख्या 500 च्या वर गेली. जून महिन्यात ही रुग्णसंख्या 700 पासून 900 च्या वर गेली आहे. मुंबईत गेल्या दहा दिवसात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
सेलिब्रिटींच्या पार्ट्या, मार्केटमधील गर्दी - मुंबईत रुग्णसंख्या वाढत असताना बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर यांनी दिलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या सेलीब्रिटींपैकी अभिनेत्री कॅटरिना कैफ, अभिनेता कार्तिक आर्यन आदी पॉजिटीव्ह आले आहेत. या पार्टीमध्ये सहभागी झालेले आणखी काही अभिनेते, अभिनेत्र्या पॉजिटीव्ह आले आहेत. मात्र त्यांनी करण जोहर यांच्या अडचणी वाढतील म्हणून शांत राहणे पसंद केले आहे. यामुळे करण जोहर यांची पार्टी सुपर स्प्रेडर झाल्याची चर्चा आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असताना मार्केटमधील गर्दी काही कमी झालेली नाही. दादर, क्रॉफर्ड मार्केट आदी ज्या ठिकाणी मार्केट आहे अशा सर्वच ठिकाणी गर्दी होत आहे. गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊ शकतो.
पालिका सज्ज - मुंबईत कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाशी संपर्क साधला असता, सध्या रुग्णसंख्या वाढत असली तरी 97 टक्के रुग्ण लक्षणे नसलेले आहेत. रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याचे प्रमाणही कमी आहे. पालिकेची रुग्णालये, जंबो कोविड सेंटरमध्ये बेडस तयार आहेत. ऑक्सिजन, औषधे यांचा पुरेसा साठा आहे. यामुळे रुग्णसंख्या वाढल्यास पालिका त्यासाठी सज्ज असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी दिली. मुंबईकरांनी मास्क घालणे, हात स्वच्छ धुणे, गर्दीत सुरक्षित अंतर पाळावे या कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.